BREAKING : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचा आदेश

| Updated on: Nov 07, 2022 | 5:55 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन केलाय.

BREAKING : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचा आदेश
Follow us on

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तारांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहेत. कार्यकर्ते इतके संतापले आहेत की त्यांनी सत्तार यांच्या औरंगाबाद येथील राहत्या घरावर दगडफेक केली, तसेच मुंबईतील घराच्या काचा फोडल्या. राष्ट्रवादीकडून सत्तार यांनी माफी मागावी. तसेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होतेय. या सगळ्या राजकीय गदारोळादरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन केलाय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करत आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची सूचना दिलीय.

विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचल्याची देखील बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे यांच्या या आदेशानंतर सत्तार सुप्रिया सुळे यांची माफी मागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही वेळापूर्वी अब्दुल सत्तार यांना फोन आला होता. त्यावेळी सत्तार घाईगडबडीने बाजूला गेले होते. मात्र त्या फोनच्या संभाषणावरुन शिंदे नाराज होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच शिंदेनी सत्तार यांना माफी मागण्याची सूचना दिल्याची देखील माहिती समोर आलीय.

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या सगळ्या गदारोळावर खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. खरंतर सुप्रिया यांनी सत्तारांच्या टीकेवर बोलणंच टाळलेलं नाही. “मला अब्दुल सत्तार यांच्यावर काहीच बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय.

कार्यकर्ते आक्रमक, राज्यात फिरु न देण्याचा इशारा

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली नाही तर त्यांना राज्यात फिरु देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलीय. “अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अपमान केलाय. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. सत्तार जोपर्यंत सुप्रिया सुळे यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावरच काय, तर त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करु. सत्तार यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.