औरंगाबाद : आज मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा (Uddhav Thackeray Aurangabad Sabha) होतेय. त्याआधी शिवसेना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांविषयी बोलाल तर थोबाड लाल करू”, असा त्यांनी इशारा दिला आहे.
आज औरंगाबादच्या सभेत चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. “कुणीही उठतं मुख्यमंत्र्यांबाबत बोलतं. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंबद्दल बोलतात. आम्ही सहन करणार नाही. फालतू शक्ती कपूर- किरीट सोमय्या उठसूठ मुख्यमंत्र्यांबाबत बोलतो. इथून पुढे जर शिवसेनेबाबत, मुख्यमंत्र्यांबाबत अवाक्षर काढलं तर आम्ही त्याचं थोबाड लाल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल अरे-तुरे बोलतो. त्याला म्हणावं संभाजीनगरला ये… तुला दाखवतो…”, असं खैरे यांनी म्हटलंय.
संजय राऊतांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणा आधी मनोगत व्यक्त केलं. “व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर सगळेच शिवसेनेचे वाघ आहेत आणि वाघाचा बाप पाच मिनिटात येत आहे. मराठवाड्यात खूप वर्षानंतर असी विराट सभा होतेय. 37 वर्षापूर्वी जेव्हा इथं शाखा स्थापन झाली तेव्हा कुणाला वाटलंही नसेल की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि तेही मुख्यमंत्री म्हणून… काय ही गर्दी… असं वाटतं की समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटेचा तडाखा भाजपला बसला तर पाणी मागायलाही उठणार नाहीत. अशी प्रचंड लाट इथे उसळली आहे. ही लाट पाहून मी इतकंच सांगतो ही आंधी है तुफान है… कोई तोड नहीं है उद्धव ठाकरे का…”, असं राऊत म्हणाले.
“ही लाट दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र, हा मराठवाडा कुणाचा ही सांगणारी ही सभा आहे. काही लोक मधल्या काळात येऊन गेले. पण मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणाऱ्याची औलाद अजून जन्माला यायची आहे”, असंही राऊत म्हणालेत.