बीड : मी भाजपची आहे. भाजप माझा थोडीच आहे, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्यासमोरच पंकजा यांनी हे विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला. ही चर्चा थांबते न थांबते तोच पंकजा मुंडे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भेटणार असल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे तर पंकजा या बंड करणार असल्याच्या चर्चांना अधिकच बळ आलं. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना प्रत्येक पक्षात इन्कमिंग सुरू असतंच असं सूचक विधान करून राजकीय चर्चांना फोडणी दिली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना मोठ्या भावाच्या नात्याने राजकीय सल्ला दिला आहे. हा सल्ला आता पंकजा मानणार का? हे पाहावं लागणार आहे.
टीव्ही9 मराठीशी वन टू वन गप्पा मारताना धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना मोठा राजकीय सल्ला दिला आहे. काही झालं तरी भाजप हा आता बदलला आहे. भाजपचं नेतृत्व बदललं आहे. भाजपमध्ये नव्याने लोक आले आहेत. भाजप आज समुद्र आहे. पंकजा ही माझी बहीण आहे. अशा परिस्थिती कुठं काय बोलावं? त्या बोलण्याने आपलं नुकसान तर होणार नाही ना? याचा विचार करून बोललं पाहिजे. या गोष्टी बोलताना, थोडी सबुरी घेतली पाहिजे, असा मोलाचा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
भाजपला गोपीनाथ मुंडेंनी भरपूर दिलं. हे देत असताना भाजपनेही गोपीनाथ मुंडे साहेबांनाही भरपूर दिलं. भाजपने गोपीनाथ मुंडेंकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. उपमुख्यमंत्रीपद दिलं. संसदेत गेले त्यावेळी उपनेते म्हणून जबाबदारी दिली. पहिल्यांदा भाजपचं केंद्रात सरकार आलं. तेव्हा ग्रामविकास खात्याची जबाबदारी दिली.
त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यावेळीही भाजपने पंकजा यांना मंत्रिपद दिलं. त्यामुळे जेव्हा बॅडपॅच असतो, त्यावेळी आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे. कारण महाजन-मुंडे यांची पुण्याई पाठी आहे. त्यामुळे मुंडे यांना मानणारा वर्ग मुंडेंची कन्या म्हणून तुमच्याकडे बघत असतो. अशावेळी काही बोलणं. त्यांच्या मनातील उद्विग्नता बाहेर येणं त्यासाठीची ही परिस्थिती नाही. ही योग्यवेळ नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात कोणी काय बोलावं हे मी ठरवू शकत नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
गावातील निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात संवाद निर्माण झाला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमचा कसलाही राजकीय संवाद झालेला नाही. माझे वडील 30 वर्ष नाथ्रा ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच होते. आमच्या गावात निवडणूक झाली. गोपीनाथ मुंडे यांनी निर्णय घेतला. आम्ही पक्षापासून बाजूला झालो. त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या त्या सामंजस्याने करण्याचा निर्णय घेतला. गावात राजकारण नको. आपलं घर फुटलं, पण आपल्यामुळे गावातील प्रत्येक घर फुटू नये हा आमचा हेतू होता. त्यामुळे आम्ही सामंजस्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, असं त्यांनी सांगितलं.
नाथ्रा गावात आम्ही मुंडे साहेब असताना एकमेकांविरोधात लढलो. तेव्हा भाजपचा पराभव झाला. आज तो विषय बोलण्यासारखा नाही. पण वैद्यनाथ कारखान्याच्या बाबतीत आम्ही संवाद ठेवायचा निर्णय घेतला. आज हा कारखाना माझ्या दृष्टीने भावनिक आहे. कारण या कारखान्यासाठी माझ्या वडिलांनी घाम गाळला. रक्त सांडलं. गोपीनाथ मुंडे यांनी कारखाना अनेक संघर्ष करून उभा केला. या भागातील शेतकऱ्यांचं भलं व्हावं. त्यासाठी हा कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न झाले. मधल्या काळात हा कारखाना डबघाईला आला. मी निवडणूक लढलो असतो तर कारखाना डबघाईतून बाहेर आला असता, असंही त्यांनी सांगितलं.