जालनाः शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी खोचक टीका भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. जालन्यात टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासात हाती येतील. सुरुवातीचे कौल पाहता या दोन्ही राज्यांमध्ये शिवसेना (ShivSena) सपशेल आपटल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Election) आणि गोव्यातही पक्ष विस्ताराचे धोरण ठेवत शिवसेनेने नशीब आजमावले. याआधीही शिवसेनेने असे प्रयोग केले आहेत. मात्र त्यात फारसे यश आले नव्हते. यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं चित्र आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला हार पत्करावी लागणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी टीका रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय.
उत्तर प्रदेश आणि गोव्यातील शिवसेनेच्या पराभवावर खोचक टीका करताना रावासाहेब दानवे म्हणाले, शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचं स्वरप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा पक्ष जिथे जाईल तेथे उमेदवारांचं डिपॉझिट जप्ट होईल.’
देशातील निवडणुकांमध्ये भाजपला जनतेनं झुकतं माप दिल्याचं चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसतील, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे 2024 मध्ये राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आम्ही पाडणार नाही तर जनताच हे सरकार पाडेल, असा इशाराही रावसाहेब दानवे यांनी दिला.
यंदा उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी शिवसेनेने 51 जागांवर निवडणूक लढवली. मात्र यात कुठेही शिवसेनेला खाते उघडता आले नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही येथे एकमेव उमेदवार उभा केला होता. अनुपशहर येथून ज्येष्ठ नेते के.के. शर्मा यांना उतरवण्यात आलं होतं. मात्र त्यांचा येथे पराभव होताना दिसत आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. गोव्यात तर संजय राऊत अनेक दिवस तळ ठोकून होते. येथे महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे प्रयत्नही झाले. मात्र काँग्रेसने स्वबळावर लढवण्याचे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. शिवसेनेने गोव्यात 10 उमेदवार उभे केले होते. मात्र येथेही त्यांना अपयशाला तोंड द्यावे लागले. पाच राज्यांतील जनतेने दिलेला कौल हा महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम करणारा ठरेल, असे बोलले जात आहे.
इतर बातम्या-