औरंगाबाद : अगदी 2 दिवसांपूर्वी नाराजी नाट्यामुळे चर्चेत आलेल्या पंकजा मुंडे आज (16 जुलै) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी चर्चेला कारण पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याचे बँक खातं ईपीएफओ विभागाने सील केल्याचं आहे. मात्र, पंकजा मुंडेंनी आपलं कोणतंही खातं सील झालं नसल्याचं म्हटलंय. या साखर कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत. हा साखर कारखाना अनेक दिवस चांगला चालू होता. कारखान्याने दैदिप्यमान कारकीर्द सुद्धा पाहिली आहे. मात्र पंकजा मुंडे चेअरमन झाल्यापासून हा कारखाना गटांगळ्या खातो आहे.
सुरुवातीला सुरुवातीला हा कारखाना कामगारांची पगारच दिली जात नसल्यामुळे चर्चेत होता. पंकजा मुंडे जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होत्या अगदी त्याच वेळेला या कारखान्यातले काही कामगार आपला पगार मिळावा म्हणून वैद्यनाथ कारखान्याच्या दारावरती उपोषण करत होते. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं खरं, पण पंकजा मुंडे यांना विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसला.
इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांनी त्याही पुढे जाऊन या कामगारांचं भविष्य निर्वाह निधीचा भत्ताच भरला नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागाने पंकजा मुंडे यांच्या कारखान्यांना अनेक नोटिसा बजावल्या. मात्र, पंकजा मुंडे यांच्या कारखान्याने या नोटिसांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे सरतेशेवटी भविष्य निर्वाह निधी विभागाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील केलं.
ईपीएफओ विभागाने बँक खात्यात असलेले तब्बल 92 लाख रुपये बाहेर काढत कामगारांच्या नावावर भरले. भविष्य निर्वाह निधी विभागाने पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचं थेट अकाउंट सील करत मोठी कारवाई केली. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसलाय. हा धक्का राजकिय नसला, तरी राजकारणावर नक्की परिणाम करणारा आहे.
ईपीएफओ कार्यालयाने कारवाईची माहिती दिलेली असली तरी स्वतः पंकजा मुंडे यांनी आपलं कोणतंही खातं सील झालं नसल्याचा दावा केलाय.