औरंगाबादः कसबा पोटनिवडणुकीचा निकाला जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांनीही त्याचे विश्लेषण केले आहे. तर भाजपच्या नेत्यांनी या निकालाविषयी बोलताना त्यांनी पराभव मान्य करत आमच्या झालेल्या चुका आगामी काळात दुरुस्त करू असं स्पष्टपणे सांगितले तर दुसरीकडे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे विश्लेषण करताना ते म्हणाले की अश्विनी जगताप यांचा विजय हा सहानुभूतीची लाट असल्यामुळे झाला आहे तर रवींद्र धंगेकर यांचा विजय मात्र जबरदस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत खैरे यांनी बोलाताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय हा मतदारांचा बदलता कल आहे. त्याचा हा परिणाम आहे. त्याचबरोबर आता राज्यातील मतदारांचा कल हळूहळू बदलत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या निकालाचा परिणाम दिसून येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे लोकांच्या मनातील कल समजला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर मतदारांचा रोष असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आजचा निकाल आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी बोलताना सांगितले.
कसबा पोटनिवडणुकीचे विश्लेषण करताना अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि राजकीय नेत्यांनी बोलताना सांगितले की, कसबा हे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी येथे तळ ठोकला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा येथील राजकीय सभा गाजवल्या होत्या. त्यातच महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना त्यांनी धंगेकर यांच्यावरही त्यांनी टीका केली होती.
तसेच या पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत हा विजय बदलत्या मतदारांचा कौल आहे असं स्पष्ट सांगितले आहे.