औरंगाबाद ते शिर्डी प्रवास फक्त सव्वा तासांचा होणार, नव्या रेल्वे मार्गासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु

| Updated on: Aug 02, 2021 | 5:56 PM

औरंगाबाद ते शिर्डी असा रेल्वेप्रवास आता आणखी सोपा होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद-अहमदनगर-शिर्डी या मार्गाने नवा रेल्वे मार्ग निर्माण करण्याचा प्रशासन विचार करत आहे.

औरंगाबाद ते शिर्डी प्रवास फक्त सव्वा तासांचा होणार, नव्या रेल्वे मार्गासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु
aurangabad railway
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद ते शिर्डी असा प्रवास आता आणखी सोपा होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद-अहमदनगर-शिर्डी (Aurangabad Ahmednagar Shirdi new railway route) या मार्गाने नवा रेल्वे मार्ग निर्माण करण्याचा प्रशासन विचार करत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात तोंडी चर्चा झाली आहे. याबाबत जिल्हाधिकार चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिलीय. दानवे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर औरंगाबाद-नगर असा रेल्वे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (government is thinking to create Aurangabad Ahmednagar Shirdi new railway route district collector Sunil Chavan and Raosaheb Danve have discussion on it)

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण- रावसाहेब दानवे यांच्यात चर्चा

औरंगाबादहून अहमदनगर तसेच शिर्डी येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच आहे. साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डी येथे जात असतात. यामुळे औरंगाबाद-अहमदनगर-शिर्डी या मार्गावरील दळणवळण आणखी सोपे होण्याची गरज असल्याचे म्हटले जात होते. त्या दृष्टीने औरंगाबाद प्रशासनाने सकारात्मक विचार केला होता. त्याचाच एक भाग म्हणून आता औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बातचित केली. यामध्ये औरंगाबाद-अहमनगर-शिर्डी असा नवा रेल्वेमार्ग तयार करण्यावर चर्चा झाली. तसेच या चर्चेनंतर औरंगाबाद ते अहमदनगर असा रेल्वे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शिर्डी ते औरंगाबाद होणार सव्वा तासांचा प्रवास

या नव्या रेल्वेमार्गामुळे औरंगाबाद-पुणे शहरातील व्यापारी देवाणघेवाण सोपी होणार आहे. तसेच शिर्डी ते औरंगाबाद असा प्रवास हा फक्त सव्वा तासांचा होणार आहे. औरंगाबाद-शिर्डी मार्ग वेगवान केल्यामुळे येथे विकासाची गती वाढेल, असा दावा औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने केला आहे. औरंगाबाद-नगर-शिर्डीसाठीच्या नव्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव हा सध्या प्राथमिक स्तरावरील आहे.

इतर बातम्या :

Video | औरंगाबाद पंचायत समितीत तुफान राडा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाजप सभापतीला मारहाण

जिल्हा शल्य चिकित्सकाचा थाटात निरोप समारंभ, कोरोना नियमांना हरताळ, औरंगाबाद प्रशासन कारवाई करणार ?

कोरोनाची तिसरी लाट डेंजर, एकट्या मराठवाड्यात दररोज 1 लाख रुग्णवाढीचा अंदाज