औरंगाबादः जालना महामार्गावरील शेकटा परिसरात गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी मोठा सापळा रचून पकडला. सदर गुटख्याच्या ट्रकची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी करमाड पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई पार पाडली. ट्रकमधून एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. करमाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याच्या पुड्या आढळून आल्यावर औरंगाबादेत एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
रविवारी एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा गुटखा घेऊन जाणारा एक ट्रक अमरावतीहून मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी करमाड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी बरेच अंतर पाठलाग करत या ट्रकला शेकटा शिवारातील गोलटगाव फाट्याजवळ आयशर ट्रक आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला.
गुटखा घेऊन जाणाऱ्या या ट्रकमध्ये एक कोटी पंचवीस हजारांचा गुटखा आढळला. पोलिसांनी वाहनासह चालक आणि आणखी एकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर करमाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, आदींनी पार पाडली.
इतर बातम्या-