Marathi News Maharashtra Aurangabad In what words will you respond to Raj Thackeray criticism State attention to Uddhav Thackeray meeting in Aurangabad
Uddhav Thackeray : आज औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची सभा, उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? आजच्या सभेकडं राज्यभराचं लक्ष
आज औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा आहे. या सभेकडे राज्यभराचं लक्ष लागून आहे.
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची आज सभा
Follow us on
औरंगाबाद : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादेतील सभेकडं राज्यभराचं लक्ष लागून आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी शिवसेना नेते औरंगाबादेत (Aurangabad Speech) ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्र्यांची ही सभा रेकॉर्डब्रेक होणार, असा दावाही शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा स्टेजच्या एका बाजूला ठेवण्यात आला आहे. तसेच सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असल्यानं संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. औरंगाबाद शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी हजारो झेंडे मागवण्यात आले आहेत. या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. सभेसाठी दीड हजार पोलिसांचे सुरक्षा कवच आहे. यामध्ये 5 डीसीपी, 7 एसीपी, 30 पीआय, 100 पीएसआय आणि 1200 पोलीस असणार आहे. तर एसरपीएफच्या तब्बल 2 तुकड्या याठिकाणी तैनात असतील. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या निगरानीखाली हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या वाहतूक व्यवस्थेत बदल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. आज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग कमान, भडकल गेटशेजारील आयटीआय मुलींचे हायस्कूल ते खडकेश्वर टी पॉइंट, मिल कॉर्नर ते महात्मा फुले चौक- औरंगपुरा, ज्युबिली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता आणि आशा ऑप्टिकल्स ते सभा मैदानाकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी मिल कॉर्नर ते भडकल गेट असा रस्ता वापरता येईल.
मुख्यमंत्र्याच्या सभेचे इतर मैदानावरही स्क्रिन
औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शहरातील इतरही मैदानांवरही स्क्रिन लावण्यात आले आहेत. कर्णपुरा मैदान, खडकेश्वर मैदान, जिल्हा परिषद वसाहत या ठिकाणी स्क्रिन लावण्यात आले आहेत. सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे येणाऱ्या रस्त्यांवरही स्क्रिन लावण्यात आले आहेत. मैदानावर पोचू न शकणाऱ्या कार्यकर्त्यांना या स्क्रिनवर सभा पाहता येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी शिवसेनेची नियमावली
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तसेच जळगाव जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी हर्सुल सावंगी बायपास मार्गे केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड नाका, देवळाली चौक, गोदावरी चौक, एम आय टी कॉलेज महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन कडून आपली वाहने कर्णपुरा पार्किंग व आयोध्या नगरी पार्किंग याठिकाणी पार्किंग करावी
जालना तसेच लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी केंब्रिज नाका, झाल्ता फाटा, बीड नाका, देवळाली चौक,एम आय टी, महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाने येऊन अयोध्या नगरी व कर्णपुरा या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावीत
नवीन धुळे सोलापूर हायवे वरून अंबड, बीड कडून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने कांचनवाडी येथुन महानुभाव आश्रम, रेल्वे स्टेशन येथून आपली वाहने अयोध्या नगरी व कर्णपुरा पार्किंग येथे पार्क करावीत
कन्नड व वैजापूर या तालुक्यातुन सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने, AS क्लब, नगर नाका, लोखंडी पूल या मार्गे येऊन कर्णपुरा पार्किंग या ठिकाणी पार्किंग करावीत
बाहेरुन जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या वाहनांनी शक्यतो पक्षातर्फे दिलेले स्टिकर व झेंडे गाडीवर समोरील दर्शनी भागात लावून यावे,
बाहेर जिल्ह्यातून येणारी वाहने यांनी आपली वाहने व्यवस्थित कर्णपुरा व अयोध्या नगरी येथे पार्किंग करावीत
आपल्या वाहनामुळे इतर वाहनांना पार्किंग करण्यास व पार्किंग मधून गाडी घेऊन जाण्यास अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी
कुठेही रस्त्यावर अस्ताव्यस्त गाड्या पार्क करू नये
पोलिसांनी दाखवलेल्या रस्त्यानेच वाहने घेऊन पार्किंग कडे यावीत, विनाकारण त्यांच्याशी हुज्जत घालू नये
पार्किंग ची माहिती होण्यासाठी विविध पॉइंटवर नेमलेल्या पोलीस अंमलदार यांची मदत घेणे, वाहने पार्किंग केल्यानंतर ती व्यवस्थित लॉक करावीत शक्य असल्यास ड्रायव्हर वाहना जवळ ठेवावेत
सभेकरिता येणाऱ्या नागरिकांनी सभा संपल्यावर व सभेसाठी जाताना आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे किंवा नागरिकांशी हुज्जत घालू नये असे प्रकार करू नये.
कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता पोलिसांच्या कोणत्याही सूचनेकडे दुर्लक्ष करणार नाही, त्या सूचनांचे उल्लंघन करणार नाही
बाहेरगावच्या कार्यकर्त्यांनी सभेसाठी येताना व जाताना ज्या ठिकाणी कोणत्याही हॉटेल वर आपण चहा-नाश्ता जेवणासाठी थांबल्यास, आपली व पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये या दृष्टीने काटेकोर वर्तन ठेवावे…
सभेच्या दरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करू नये.
सभेच्या ठिकानी कोणतीही सूचना असल्यास जवळच्या पोलिसांकडे व्यक्त करावी.
सभेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी रांगेचे पालन करावे.
सभेला येणाऱ्या महिलांचा योग्य तो आदर करावा..
सभा संपल्यानंतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अगोदर जाऊ द्यावे. त्यानंतरच पुरुषांनी निघायचे आहे म्हणजे वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत राहील,
या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुनियोजित ठेवण्यासाठी पोलिस विभाग अत्यंत खडतर परिश्रम घेत आहे.. आपल्या कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याची दक्षता घ्यावी…
सभेसाठी येताना जाताना वाहनांच्या मागे जर एखादी अॅम्बुलन्स रुग्णवाहिका आल्यास तिला सर्वप्रथम रस्ता मोकळा करून द्यावा. या सोबत वाहतूक नियोजन, पार्किंग याचा नकाशा जोडला आहे त्यानुसार पालन करावे.