औरंगाबादः भगवान शंकराला (God Shankar) प्रिय अशी फुलं कोणती आहे, त्याच वनस्पतींनी बहरलेलं एक उद्यान वेरुळच्या कैलास लेणीच्या (Ellora Caves) पायथ्याशी साकारालं, जावं अशी कल्पना पाच वर्षांपूर्वी तत्कालीन वने व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. त्यांच्याच उपस्थितीत 3 फेब्रुवारी 2016 मध्ये 5 हेक्टर जागेवर महादेव वनोद्यानाच्या उभारणीचा शुभारंभ झआला. अन् पाहता पाहता ठरलेल्या मुदतीत कैलास लेणी परिसरात दुर्मिळ वनस्पतींचं हे उद्यान बहरलं. वेरुळच्या या वनोद्यानाचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्साहात झाला. सध्या शहर तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध आहेत. मात्र ही बंदी उठताच औरंगाबादकर तसेच इथं पर्यटनासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हे उद्यान आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.
वेरूळ येथील महादेव वनोद्यानात पंचमुखी, एकमुखी, तीनमुखी, बकुळ, फ्लेमिंगो, त्रिशुळ, ओम रुद्राक्ष, नंदी, पार्वती गणपती कार्तिक, कमळ सरोवर, त्रिशूळ, डमरू, गंगा अशा आकर्षक 12 मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.
या उद्यानात प्रवेशासाठी शुल्क ठेवण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्णय काही दिवसात घेतला जाईल .पंधरा वर्षांपुढील पर्यटकांकरिता 20 ते 25 रुपये तिकीट दर आकरले जाऊ शकतात.
तसेच उद्यानात छायाचित्रणासाठी वेगळे दर आकारण्यात येतील. या तिकिट विक्रीतून येणाऱ्या निधीतून वनोद्यानाचा सांभाळ होईल व स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. हे वनोद्यान संयुक्त वन समितीस वर्ग करण्यात येईल.
सध्या महादेव वनोद्यानाचे काम वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. पेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनोद्यानात आतापर्यंत 62 प्रकारच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. यात अनेक झाडांना फुले व फळे आल्याने येथील वातावरण मनमोहक झाले आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या रुद्राक्षांना मोठ्या प्रमाणावर रुद्राक्ष आली आहेत. त्यामुळे असंख्यांसाठी हा कुतुहलाचा विषय ठरत आहे. येथील दुर्मिळ अशा वृक्षांमध्ये सिल्व्हर ओक, मेंदी, बकुळ, कदम, पांगरा, पळस, कांचन, बांबू, मोहा, महोगनी, सुपारी, बेल, टिकोंबा, रुद्राक्ष, सप्तपर्णी, पातोडिया, अर्जुन सादडा, आदींचा समावेश आहे.
वेरुळ लेणी आणि वनोद्यान यांचे वेळापत्रक एकच राहणार असून संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने यावर शुल्क आकारले जाईल. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे उद्यान सुरु राहील. सध्या कोरोनामुळे पर्यटनावर बंदी आहे. मात्र एरवी निर्बंध नसताना वेरूळ लेणी मंगळवारी बंद असते. आठवड्यातील इतर दिवशी ती सुरु राहते. सदर वनोद्यानदेखील याच दिवशी बंद राहणार आहे.
इतर बातम्या-