जालनाः केवळ नोकरी करण्यासाठी शिक्षण घेणे योग्य नाही तर शिक्षणातून देशसेवा घडली पाहिजे. शेतीत काळ्या आईची निष्ठेने सेवा करणारा आणि प्रामाणिकपणे कष्ट करणारा माणूसच यशस्वी होतो, असं वक्तव्य पद्मश्री (Padmashree) पुरस्कार विजेते हिंमतराव बावस्कर (Dr. Himmatrao Bawaskar) यांनी व्यक्त केलं. हिंमतराव साळूब बावस्कर हे मूळचे भोकरदन तालुक्यातील देहेड गावातील असून अत्यंत कठीण स्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावले. त्यांना 2022 सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. कोकणात विंचू दंशाने होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कसं कमी करता येईल, यावर त्यांनी केलेल्या भरीव कार्याची दखल भारत सरकारने घेतली. तसेच एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डॉ. हिंमतराव बावस्कर हे प्रथमच भोकरदन (Bhokardan) येथील आपल्या गावी आले. त्यामुळे गावकरी आणि कुटुंबियांनी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून जंगी स्वागत केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर म्हणाले की,’ विद्यार्थ्यांवर चांगल्या संस्कारासाठी त्यांनी सतत वाचन केले पाहिजे ,टीव्ही व मोबाईल पासून पालकांनी विद्यार्थ्यांना दूरच ठेवले पाहिजे , पालकांनी मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले पाहिजे , शेतकऱ्यांने शेती नीट निष्ठेने केली पाहिजे शेतीत उत्पादन वाढीसाठी सदैव कष्ठ केले पाहिजे , सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक पिकाला हमीभाव दिलाच पाहीजे’ असे डॉक्टर बावसकर म्हणाले.
यावेळी डॉक्टर बावस्कर यांचे ज्येष्ठ बंधू भगवानराव बावस्कर यांनी हिम्मतराव बावस्कर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. डॉ. हिम्मतराव यांनी केलेल्या संशोधनाचा जगातील प्रत्येक मानव जातीला फायदा होत आहे. एवढे मोठे भाग्य आमच्या कुटुंबाला मिळाले त्यांनी देहेड गावाचे नव्हे तर भोकरदन तालुक्याचे नाव अजरामर केले असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉक्टरांच्या पत्नी डॉक्टर प्रमोदिनी बावस्कर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, आम्ही रुग्णांची अविरत सेवा करीत आहोत गरीब रुग्णांचे प्राण वाचविणे हेच आमचे महत्त्वाचे ध्येय होते. कुठल्याही पुरस्काराची आम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मात्र पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने आम्ही भारावून गेलो. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्या अथक परिश्रमाची योग्य ती दखल घेण्यात आली. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर हे अत्यंत कडक शिस्तीचे व वेळेचे पक्के आहेत. त्यांना कुठलीही गोष्ट वेळेवर करणे महत्त्वाचे असते. सुरुवातीच्या काळात कोकणामध्ये आम्ही अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ही राहीलो , घरात विंचू बाहेर साप अशा परिस्थितीत आम्ही राहिलो आहे तेव्हा कौलारू च्या घराला गोणपाटाचे आच्छादन करून आम्ही दोघे तिथे राहत होतो व विंचूदंशाच्या गोरगरीब रुग्णांची सेवा करीत होतो मृत्युदर कमी करण्यासाठी विंचूदंशावरते लस शोधून त्या गरीब रुग्णाचे वाचलेले प्राण हाच आमच्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
इतर बातम्या-