औरंगाबादः कोरोना संकटामुळे का होईना, दोन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा घरा-घरात महाभारत (Mahabharat) आणि रामायण (Ramayan) नव्यानं पाहिलं गेलं. विशेष म्हणजे पूर्वी ज्या एकोप्यानं अख्खं कुटुंब महाभारत पाहत होतं, त्याच पद्धतीनं लॉकडाऊनच्या कारणामुळे घरातील सगळी मंडळी एकत्र येऊन महाभारत पाहू लागली. या निमित्तानं पुन्हा घरा-घरात तोच आवाज घुमला.. मै समय हूं.. धीरगंभीर शैलीत महाभारताचं कथानक सांगणारा हा आवाज म्हणजे या मालिकेचा जणू आत्माच आहे. महाभारतातले अनेक किस्से एका सारगर्भित संदेशासोबत जोडण्याचं काम या आवाजानं केलं. हा आवाज देणारा कलाकार कधीही पडद्यासमोर आला नाही, मात्र कलाकारांपेक्षाही जास्त लोकप्रियता त्यानं मिळवली. या धीरगंभीर आवाजाचे धनी आहेत हरीश भिमानी (Harish Bhimani). आज 15 फेब्रुवारी या त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कलाकाराच्या जीवनावर टाकलेला एक प्रकाशझोत…
हरीश भिमानी यांचं घराणं मूळ राजस्थानमधील जैसलमेरचं होतं. त्यांचे पूर्वज गुजरातमधील मांडवी आणि नंतर कोलकात्याला स्थायिक झाले होते. हरीश यांचा जन्म मुंबईचा. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई आणि पुढे लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर येथे त्यांचं शिक्षण झालं. पुढे जमनालाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टटीजमध्ये त्यांनी एमबीए केलं. सुरुवातीला टीव्ही वृत्तपत्र निवदेकाच्या भूमिकेत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेद्वारे त्यांच्या आवाजाची जादू घराघरात पोहोचली असली तरीही त्यांनी इतर अनेक टीव्ही मालिकांमद्ये आवाज दिला आहे.
एका अहवालानुसार, हरीश यांनी 22 हजारांहून अधिक रेकॉर्डिंग केल्या आहेत. 1980 च्या दशकानंतर त्यांनी अनेक सार्नजनिक ठिकाणी कार्यक्रम घेतले. अनेक ठिकाणी प्रभावी निवेदकाची भूमिका साकारली. त्यानंतर अनेक डॉक्युमेंट्री, कॉर्पोरेट फिल्म, टीव्ही, रेडिओवरील जाहिराती, खेळ, संगत अल्बममध्ये त्यांनी आवाज दिला. 2016 मध्ये मराठी डॉक्यू फीचर मला लाज वाटत नाही याला सर्वोत्कृष्ट व्हॉइस ओव्हर म्हणून हरीश भिमानी यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.
एका मुलाखतीदरम्यान, हरीश भिमनी यांनी सांगितले की, महाभारत मालिकेसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची चाचणी सुरु होती. हरीश भिमानी यांनी ती दिली. तीन दिवसांनंतर महाभारतात शकुनी मामांचे पात्र साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचा त्यांना फोन आला. त्यांना मालिकेत आवाज देण्यासाठी बोलावून घेतले आणि नेमका कशा पद्धतीने संपूर्ण महाभारताचे कथानक अत्यंत प्रभावी पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे, याबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी अत्यंत समर्पण पूर्वक हे काम केले आणि महाभारतातला हा आवाज अजरामर झाला.
मुकेश खन्ना यांनी घेतलेल्या एका मुलाखतीदरम्यान, हरीश भिमानी यांना चांगला प्रश्न विचारण्यात आला. समय या शब्दाशी, संकल्पनेशी तुमचे एवढे घट्ट नाते झाले आहे, तुम्ही स्वतःच्या आय़ुष्यात समय अर्थात वेळेकडे कोणत्या दृष्टीने पाहता? आणि महाभारतातल्या कामामुळे समय आणि तुमचे नाते काही बदलले का? असा प्रश्न मुकेश खन्ना यांनी विचारला. यावेळी हरीश भिमानी म्हणाले, मै समय हूँ… हा आवाज देण्याच्या आधीपासून मी वेळेचा खूप आदर करतो. पण महाभारत मालिका झाल्यानंतर मी वेळेला घाबरू लागलो. आपण सातत्याने वेळेचे परीक्षण केले पाहिजे, वेळेचे समीक्षण केले पाहिजे, असे वाटते. हरीशजी म्हणतात, जेव्हा जेव्हा लोक मला समय म्हणून संबोधतात तेव्हा तेव्हा मला हे वाक्य आठवते.. समय की समीक्षा करो, बहां जा रहा है.. ये लौट कर ना आएगा.. त्यामुळे मी कधीच कोणत्याही ठिकाणी वेळ वाया घालवत नाही. अगदी ट्राफिकमध्ये असतानाही माझ्याकडे एक नोटपॅड असतो. त्यावर माझ्या काही टिप्पण्या काढणं सुरु असतं. कुणाशी फोनवर बोवलायचं असेल तर मी बोलून घेतो. अगदी एखादे वेळी एखादं फ्लाइट दोन तास लेट झाल्यावर लोक संतापतात. चिडचिड करतात. पण मला तसा राग येत नाही, कारण माझ्याकडे त्या दोन तासात करण्यासारख्या हजारो गोष्टी असतात. मी अगदी निवांतपणे तो वेळ वापरतो. तो वेळ सार्थकी लावतो…
इतर बातम्या-