औरंगाबादः लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरुळ (Ellora) येथील घृष्णेश्वर मंदिरात (Ghrishneshwar Temple) आज महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तसेच वेरुळ परिसरातून जाणाऱ्या जड वाहनांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीत काही बदल केले आहेत. वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठ दिवस यात्रा भरत असल्याने पुढील आठवडाभर औरंगाबादमधून जाणाऱ्या वाहतुकीच्या (Aurangabad traffic) मार्गात बदल केल्यास वाहने आणि प्रवाशांची गैरसोय टाळता येईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त श्री घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ येथे मोठी यात्र भरत असते. आजपासून पुढील 7 मार्चपर्यंत ही यात्रा असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे जवळपास तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. घृष्णेश्वर मंदिर वेरुळ तसेच तीर्थकुंड व वेरुळ लेणी ही सर्व ठिकाणे धुळे-सोलापूर महामार्ग क्रमांक 52 लगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. त्यामुळले सदरचा रस्ता घाटाचा असल्याने यात्रेदरम्यान वाहनांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार मार्ग अवलंबल्यास वाहनांची कोंडी होणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.