औरंगाबाद: शिवजयंतीच्या उत्सवावर राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने शिवजयंती (Shivjayanti 2021) साजरी करण्यासंदर्भात काढलेले परिपत्रक रद्द करावे व सर्व अटी-शर्ती मागे घ्याव्यात, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे. (Maratha Kranti Morcha stand on Shivjayanti 2021)
ते शुक्रवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. सद्यस्थितीत आम्ही शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली असती. पण सरकारला निवडणुका आणि मेळावे चालतात, त्यासाठी गर्दी झाली तर चालते. राज्यातील चित्रपटगृहेदेखील पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत. मग शिवाजी महाराजांची जयंती का चालत नाही?, असा सवाल विनोद पाटील यांनी उपस्थित केला.
यंदाच्या वर्षी शिवजयंती उत्सवात शिवसेनेनेही सहभागी व्हावे. शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह सोडावा. तसेच शासनाकडून शिवजयंतीसंदर्भात काढण्यात आलेले परिपत्रकही रद्द करावे, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केले जातात. एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवप्रेमी करतो. अशा या सुंदर कार्यक्रमावर महाराष्ट्राचे सरकार जर बंदी घालत असेल तर ते निषेधार्ह आहे. त्यामुळे सरकारने काढलेला फतवा तात्काळ पाठीमागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसकट परवानगी द्यावी. वेळ पडली तर ‘मिरवणुका रद्द करा, मात्र कार्यक्रम झाले पाहिजेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे, पोलीस त्यांना परवानगी देतात. पण शिवजयंतीला मात्र बंदी घातली जाते. भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते महाराष्ट्र पश्चिम बंगाल’सह देशभर फिरत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते, मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. तसेच काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री महाराष्ट्रभर शेकडो लोक घेऊन फिरतात, कार्यक्रम घेतात, मात्र पोलिस त्यांना परवानगी देतात आणि सरकार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बंदी घातली जाते हे निषेधार्ह असल्याची टीकाही संभाजी ब्रिगेडने केली.
संबंधित बातम्या
सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी
मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली
Video: जेव्हा पडळकर-मिटकरी एकमेकांविरोधात ‘आरे तुरे’वर येतात, पाहा हमरीतुमरी Exclusive
(Maratha Kranti Morcha stand on Shivjayanti 2021)