संभाजी नगर : महाविकास आघाडीची पहिलीच संयुक्त सभा आज संभाजीनगरमध्ये होत आहे. संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही गौप्यस्फोट करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच या सभेतून उद्धव ठाकरे भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला करणार असल्याने या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना दोन प्रश्न विचारून कोंडीत पकडलं आहे. शिरसाट यांच्या या दोन प्रश्नामुळे उद्धव ठाकरे यांची मोठी गोची होणार असून उद्धव ठाकरे या प्रश्नावर भाष्य करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांना मंत्रिपद का दिलं? हे आजच्या सभेत क्लिअर करावं. तसेच इतर दोन आमदारांनाही राज्यमंत्रिपद का दिलं हे सुद्धा स्पष्ट करावं. सरकारकडे पूर्ण बहुमत होतं. बहुमताला आकडा कमी नसतानाही तुम्ही खोके घेऊन गडाख आणि इतर दोन मंत्र्यांना मंत्रीपद दिलं. तुम्ही खोके घेतले होते की नाही? खरं सांगा. तुमच्या पक्षात हे लोक आले होते का? मग आता या जाहीर सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा की, तुम्ही गडाखाना मंत्रिपद घेताना खोके घेतले नाही, असं आव्हानच संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
मी जे आरोप करतोय त्याला सबळ पुराव्यांची काही गरज नाही. आमच्याकडे पुरेसे आमदार होते. संख्याबळ होतं. बहुमत होतं. असं असताना 56 आमदार सोडून तुम्ही गडाख आणि अपक्ष आमदारांना मंत्रिपद का दिल? यात खोक्याचं काम झालं नसेल का?, असा सवाल करतानाच आजची सभा ही हतबल सभा आहे, अशी टीका शिरसाट यांनीकेली.
शिरसाट यांनी दुसऱ्या प्रश्नावरूनही उद्धव ठाकरे यांना घेरलं आहे. आजच्या सभेत तुम्ही संविधानाची पूजा करणार आहात. ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याशी तुम्ही युती केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर या सभेत का नाही? आंबेडकरांना सभेपासून दूर ठेवण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
यावळी त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. संजय राऊत यांना फक्त रेड्याचं दूध काढायचं माहिती आहे. गाई आणि म्हशीचं माहीत नाही. काल संजय राऊत यांचा स्टंट झाला ना? 2 तासात कळलं ना काय झालं म्हणून. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. हेच एकदा त्यांनी खासगीत बोलून दाखवलेलं होतं. ही किमया फक्त संजय राऊत करू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
पाच आमदार म्हणजे शिवसेना नाही हे मी मानतो. इतके लोक तुम्हाला सोडून का जात आहेत? या संदर्भात जरा विचार करा. तुमची वागणूक तर याला कारणीभूत नाही ना? आम्ही भाजप सोबत गेलो म्हणून मोठे झाले नाही. पण आle आम्ही मुख्य प्रवाहात आलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.