औरंगाबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली, त्यानंतर लोकसभा अध्यक्ष यांनी राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द केली. या दोन घटनांमुळे राज्यातील राजकारण ढवळून आता निघाले आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात भाजप आता आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समर्थनार्थ आता गौरवयात्रा काढण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज कालीचरण महाराज यांनी गांधी हत्येचं समर्थन करत नथुराम गोडसे यांनी केले आहे ते योग्यच केले असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.त्यामुळे आता काँग्रेसकडून कालीचरण आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे.
या प्रकरणावरून राजकारण तापलेले असताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे की, सावरकर गौरव यात्रा ही देशाचा स्वाभिमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तर सावरकर ज्यांना कळालेले नाहीत त्यांना पुन्हा सावरकर दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.गौरवयात्रेच्या निमित्ताने आम्ही समाज प्रबोधन करत असल्याचेही संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे.
आमदार संजय शिरसाठ यांनी सावरकर यांच्याविषयी बोलतना ते म्हणाले की,सावरकर किती ग्रेट आहेत हे उद्धव ठाकरे यांनासुद्धा माहिती आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सातत्याने सावरकरांचा गौरव करत होते असंही त्यांनी स्पष्ट सांगितले. या गोष्टीवर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची साथ सोडली पाहिजे फक्त राहुल गांधी यांना विरोध करूनही काही होणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
आम्ही भाजपसोबत या गौरव यात्रेच्या परवानगी संदर्भात पोलिसांकडे अर्ज केला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी 15 अटी शर्तींसह परवानगी दिलेली आहे.
त्याची अंमलबजावणीही त्यांनी केली पाहिजे असं आमचं म्हणणं नाही तर पोलिसांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे आम्हालादेखील परवानगी ही पोलिसांकडून मिळणार कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्याचे काम हे पोलिसांचा असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे.
सावरकर यात्रेमुळे जर परिस्थिती बिघडू शकते असं पोलिसांना वाटलं तर ते परवानगी नाकरतील परंतु मला विश्वास आहे की पोलीस आयुक्त यासाठी परवानगी देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
कालिचरण महाराज यांनी आज गांधी हत्येचं आणि नथुराम गोडसे यांचे समर्थन केले आहे. त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा आपला लोकशाहीचा देश आहे विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
जर राहुल गांधी बोलत असतील की “मी सावरकर नाही मी गांधी आहे म्हणून” तर गोडसेंना मानणारे लोकसुद्धा असू शकतात म्हणून प्रत्येकाला वक्तव्य करत असताना स्वातंत्र्य आहे.कोणाला जवाहर लाल नेहरू आवडतात तर कोणाला सुभाषचंद्र बोस आवडतात हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे.
जर कालीचरण महाराज यांच्या वर कारवाई करण्याची मागणी झाली तर सावरकरांच्या संदर्भात ज्यांनी खुलेआम वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावरदेखील कारवाईची मागणी होणारच असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
काही लोकांना वाकून बघण्याची सवय असते तर आपलं ठेवा झाकून दुसऱ्यांचा बघा वाकून ही जी पद्धत आहे त्याचमुळे हा वाद रंगत चाललेला आहे असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांची स्वतःची सभा असली असती तर त्यांचं मी स्वागत केलं असतं, परंतु ही महाविकास आघाडीची सभा आहे. ज्या शिवसेनाप्रमुखांनी हे मैदान गाजवलेलं आहे.
त्या मैदानामध्ये आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाला उद्धव ठाकरे यांच्याकडून संधी मिळते आहे अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उद्या उद्धव ठाकरे हे मंचावर भारत मातेचे पूजन करणार आहेत मात्र हे काँग्रेसच्या पचनी पडणार आहे का? हा कळीचा मुद्दा आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.