औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होत आहे. या सभेची मनसे (mns) पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. या सभेला लाखो लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. औरंगाबाद महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या सभेकडे पाहिले जात आहे. राज यांची ही सभा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. राज यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्याने ते चर्चेत होते. त्यामुळे औरंगाबादमधील (aurangabad) त्यांच्या सभेला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी बैठकांवर बैठका घेऊन राज यांना सशर्त सभा घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे राज यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा ऐवजी रेल्वे इंजिन घेण्यात आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी राजमुद्रा ऐवजी इंजिन का घेतलं? असा प्रश्नही सर्वांना पडला आहे.
राज ठाकरे यांनी झेंड्यावर पुन्हा इंजिनचं चिन्हं आणण्यामागे दोन कारणं सांगितली जात आहेत. एक म्हणजे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत मनसेला दमदारपणे उतरायचं आहे. त्यासाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे. अशावेळी सभा, मेळावे घेताना पक्षाचं चिन्हंही लोकांपर्यंत गेलं पाहिजे. किंबहुना हे चिन्हं लोकांच्या नजरेसमोर सतत असले पाहिजे त्यासाठी मनसेने झेंड्यावर रेल्वे इंजिनचं चिन्हं घेतल्याचं सांगितलं जात आहे. झेंड्यावर पक्षाचं चिन्हं घेतल्याने मतदारांच्या मनावर चिन्हं कोरलं जातं. कोणत्या पक्षाला वाढायचं असेल तर त्याचा झेंडा, चिन्हं आणि विचारधारा मतदारांपर्यंत वारंवार गेली पाहिजे. त्यामुळेही हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळेही कदाचित त्यांनी झेंड्यावर इंजिन चिन्हं घेतलं असावं, असं सांगितलं जातंय.
2020मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसेने महाअधिवेशन आयोजित केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं होतं. राज ठाकरे यांनी भगव्या झेंड्यांचं अनावरण केलं होतं. त्यावर रेल्वे इंजिन ऐवजी राजमुद्रा घेतली होती. त्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलं होतं. राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही प्रशासकीय मुद्रा आपल्या झेंड्यावर घेतली होती. त्यावेळी त्यांनी झेंड्याचं पावित्र्य जपण्याचं आवाहनही केलं होतं. मात्र, अवघ्या दोन वर्षातच मनसेने झेंडा बदलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.