औरंगाबाद : औरंगाबाद शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला होता. आता नाही. जर बालेकिल्ला आहे तर मग एमआयएमचा खासदार का निवडून येतो, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी विचारला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांची सभा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीका केली. लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. एवढी वर्ष महापालिका तुमच्या ताब्यात असताना तुम्ही काय केले? अजूनही पाण्यासाठी हंडा मोर्चा काढावा लागतो, हे दुर्दैव आहे. सभा ही कोणाचे रेकॉर्ड मोडण्यासाठी नसते तर सभा ही विचारांचे सोने लुटण्यासाठी असते, असा टोला यावेळी त्यांनी लगावला. शिवसेना तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेवर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्याचा नांदगावकरांनी समाचार घेतला.
शिवसेना नेते संजय राऊत जे बोलतायेत त्यांनी एकदा त्यांची भूमिका पाहावी. जवळच्या माणसावर टीका नाही केली तर कसे होणार होणार, असा सवाल करत आम्ही शांत बसूनही आमची प्रसिद्धी होते, असे नांदगावकर म्हणाले. जर आमच्या भूमिका बदलत आहेत, तर दखल का घ्यावी लागते, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
मनसे आणि भाजपा युतीवर मी बोलणार नाही. राज साहेबांची सगळ्यांशीच जवळीक आहे. त्यामुळे यावर राज ठाकरे अधिक बोलतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. याचवेळी राज ठाकरेंच्या सभेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार म्हणून अनेकजण टीका करत आहेत, त्यालाही नांदगावकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
उद्या सकाळी आठ वाजता राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून औरंगाबादकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती मिळत आहे.