चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम, मनसे नेत्याची खोचक टीका; दोन्ही नेत्यात जुंपली

| Updated on: Jul 24, 2024 | 11:53 AM

मी एका पक्षाचा प्रवक्ता आहे. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत लक्ष देणे हे माझं काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अजित पवारांनी सोबत घ्यावं की नाही हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम, मनसे नेत्याची खोचक टीका; दोन्ही नेत्यात जुंपली
chandrakant khaire
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काल प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्याशी केली होती. त्याला चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे प्रकाश महाजन यांनी आज पुन्हा एकदा खैरे यांच्यावर हल्ला चढवत त्यांना जसच्या तसं प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे यांचा निवडणुकीत खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असा हल्लाच महाजन यांनी चढवला आहे. त्यावर आता खैरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. चंद्रकांत खैरे हे देव भोळे आहेत. ते असं का बोलले हे मला समजलं नाही. मात्र सतत दोन वेळा झालेला पराभव, पक्षात कमी होत चाललेली पत आणि दोन लोकसभेच्या निवडणुकीत खर्च झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या खिशावर झाला. त्याचा परिणाम कमरेवर होण्यापेक्षा डोक्यावर जास्त झाला. ग्रामीण भागात अशा लोकांना गीण्यात गेलेले लोक अस म्हणतात, असा हल्लाच प्रकाश महाजन यांनी चढवला आहे.

आपल्याच नेत्यावर चिडले असतील

मी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून ते माझ्यावर चिडले नसतील. ते उलट त्यांच्याच नेत्यावर चिडले असतील. खैरे हे कट्टर शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळेच ते आपल्याच नेत्यावर चिडले असावेत, असा चिमटाही प्रकाश महाजन यांनी काढला.

तर मी काही करू शकत नाही

उद्धव ठाकरे अनेक वेळा राज ठाकरे यांच्यावर टीका करताता, ते मी समजून घेऊ शकतो. मात्र सुषमा अंधारे आणि इतर लोक माझ्या नेत्यावर बोलल्यावरही आम्ही सहन करतो. राजकारणात तुम्हाला टीका सहन करावी लागेल, असं सांगतानाच मोहम्मद अली जिना हे बॅरिस्टर आणि बुद्धिमान होते. त्यामुळे मी त्यांना चांगल्या व्यक्तीची उपमा दिली. यात राग येण्यासारखं काही नाही. जर बुद्धीचा आणि त्यांचा काही संबंध नसेल तर मी काही करू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

बंदी घालण्याचं कारण नव्हतं

सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात भाग घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यावरही महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या शंभर वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशांमध्ये काम करत आहे. ही एक राजकीय संघटना नसून संघ सामाजिक क्षेत्रात मोठं काम करत आहे. त्यामुळे या संघटनेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना काम करण्यास परवानगी दिली ही चांगली गोष्ट आहे. त्यावर बंदी घालण्याचं काही कारण नव्हतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा

मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडून चांगलं काम केलं आहे. कारण उपोषण केल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. आंदोलन करण्यासाठी आपली प्रकृती चांगली असायला हवी. कोणत्याही आंदोलनाला शंभर टक्के यश येत असं नाही. काही मागण्या पूर्ण होतात, काही मागण्या मागे राहतात. त्यामुळे राहिलेल्या मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हीच आंदोलनाची दिशा असते. ओबीसी आणि मराठा समाजातील विचारवंत लोकांनी एकत्र येऊन हा आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा, असं ते म्हणाले.