नांदेडः येथील कोर्ट परिसरात (Nanded Court) आज धक्कादायक घटना घडली. न्यायाधीशांकडून अपमानास्पद वागणूक मिळतेय, असा आरोप करत एका वकिलाने (Advocate) चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोर्टाच्या आवारातच वकिलाने अंगावर पोट्रोल ओतून घेतले. त्यानंतर तो आत्मदहनाचा (Self Immolation attempt) प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी वेळीच हा प्रकार रोखला. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेतील वकिलाचे नाव जयपाल ढवळे असं आहे. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून न्यायाधीशांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आता सहन होत नाहीये, असं म्हणत या वकिलाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वातावरणातील तणाव निवळला.
विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी आज लोकअदालत सुरु आहेत. नांदेडमध्येही जिल्हा सत्र न्यायालयात आजा लोक अदालत सुरु होती. यावेळी जयपाल ढवळे या वकिलाने अचानक न्यायाधीशांच्या वागणुकीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. जयपाल ढवळे असं या वकिलाचं नाव आहे. त्यांच्या अशीलाचा खटला न्या. बांगर यांच्या कोर्टात सुरु होता. परंतु न्यायाधीश बांगर यांच्याकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप ढवळे यांनी केला. यासंदर्भातले जाहीर निवेदनही त्यांनी छापून आणले होते. ढवळे यांनी सकाळी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र वजीराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वेळीच धाव घेत हा प्रकार थांबवला. त्यानंतर ढवळे यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
दरम्यान, वकील ढवळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि हे प्रकरण निवळलं. न्यायालयाच्या परिसरात एखाद्या वकिलानेच न्यायाधीशांच्या विरोधात अशा प्रकारचे आंदोलन केल्याची ही घटना या परिसरात पहिल्यांदाच घडली. या प्रकरणी पोलिसांनी वकील ढवळे यांचं म्हणणं ऐकून घेतलं असून त्यांनी केलेल्या आरोपांची आता शहानिशा केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
इतर बातम्या-