नांदेड: प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांच्या (Loud Speakers) राजकारणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघत आहे. राजकीय नेत्यांच्या (Political leaders) एकामागून एक तीव्र पवित्र्यामुळे सामाजिक शांततेला कधीही तडा जाईल, अशी शक्यता निर्माण झाली असतानाच नांदेडमधील (Nanded)एका गावातून काहीशी आशावादी, संयमी वृत्तीची बातमी हाती आली आहे. प्रार्थना स्थळांवरून सुरु असलेला भोंग्यांचा वाद या गावापर्यंत पोहोचूच शकत नाही. कारण या गावात पाच वर्षांपासून सर्व प्रार्थनास्थळांवरून भोंगेच काढून टाकण्यात आले आहेत. गावातील विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण गावाने एकत्र येऊन हा निर्णय घेतलाय आणि आजही एकजुटीने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या राजकारणापासून अलिप्त असलेलं नांदेड जिल्ह्यातलं हे गाव म्हणजे बारड गाव. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. बारड गावात पाच वर्षांपासून भोंग्यावर बंदी आहे. गावातील सगळ्याच जाती धर्माच्या प्रार्थना स्थळावर इथे भोंगे नाहीत. गावातील विद्यार्थ्यांना आवाजाचा त्रास होऊ नये, ध्वनी प्रदूषण वाढू नये यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभेत एकमताने हा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला होता. या नियमांचे आजही तंतोतंत पालन करत या गावाने राज्यात आदर्श घालून दिलाय.
बारड गावातील ग्रामस्थांच्या प्रगल्भपणाचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे या गावात नुसतीच भोंग्याला बंदी नाही तर गावातील कोणत्याही कार्यक्रमात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे सध्याच्या प्रक्षोभक आणि संवेदनशील वातावरणात बारड गावातील नागरिकांचा संयमी आणि शांततेचा विचार इतर गावे आणि शहरांनीही आपलासा केल्यास, सामाजिक सलोख्याला तडा जाण्याची भीतीच उरणार नाही.
इतर बातम्या-