नांदेड | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली कोट्यवधी रुपये हडपले असून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने होतेय. नांदेडमध्येही शिवसैनिकांनी (Nanded Shiv Sena) ही मागणी लावून धरत आक्रमक आंदोलन केले. नांदेड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला जोडे मारण्यात आले. किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळाही जाळण्यात आला. संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी जमवून तो स्वतःच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप केला. त्याचे पडसाद आज महाराष्ट्रात दिसून येत आहेत. शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, परभणीतही सोमय्यांचा निषेध करण्यात आला.
नांदेडमध्ये शिवसैनिकांनी किरीट सोमय्याच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विक्रांत नौका वाचवण्याच्या नावाखाली सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. आपला भ्रष्टाचार लपवून ठेवत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ऊठसूट टीका करणाऱ्या सोमय्या यांच्या विरोधात सेनेने ही निदर्शने केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले, तसेच सोमयाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय.
औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने क्रांती चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच परभणी, हिंगोलीतही किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोलीत आमदार संजय बांगर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. देशाशी गद्दारी करणाऱ्या सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
इतर बातम्या-