नांदेडः आज सकाळीच नांदेडमधील (Nanded) कंधार शहराजवळ मोठी दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी पोहायला गेलेल्या दोन युवकांचा नदीपात्रात बुडून करुण मृत्यू झाला. कंधार (Kandhar) शहराजवळील मन्याड नदीपात्रात पोहोण्यासाठी हे दोन युवक (Young men Died) गेले होते. मात्र नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. अखेर पाण्याबाहेर पडण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. पाण्यातील गाळात रुतल्याने त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने या दोघांचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे कंधार शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांदेडमधील कंधार शहरातील मन्याड नदीपात्रात पोहोचण्यासाठी हे दोघे युवक गेले होते. या घटनेत सौरभ लोखंडे आणि ओम काजळेकर यांचा बुडून मृत्यू झाला. सौरभ हा 16 वर्षांचा होता तर ओम हा 15 वर्षांचा होता. नदीपात्रातील गाळात रुतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने दोन्ही युवकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यामुळे कंधार शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील अन्य एका घटनेत 45 वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या धनेगाव येथे घराबाहेर झोपलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना 21 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. भागवत शिवराम गायकवाड असे मृताचे नाव आहे. या खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. भागवत गायकवाड हे आपल्या घरातील वाळू चाळत होते. रात्री 11 वाजता वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर ते घराबाहेर झोपले. मात्र साडेबारा वाजता घराच्या दरवाजाच्या उंबऱ्यावर त्यांचे डोके टेकलेले दिसले. त्यांचे डोके फुटले होते. तसेच ज्या दगडाने त्यांचे डोके फोडले तो दगड शेजारीच पडला होता. भागवत यांचा मुलगा आशिष आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी वडिलांना त्वरीत दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे सांगितले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाना गुन्हा दाखल झाला आहे.