ओबीसी नेत्यांनी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. मात्र, या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने ओबीसी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात तेव्हा त्यांना रेड कार्पेट टाकलं जातं. आम्ही उपोषण करतो तेव्हा शासनाकडून आमची साधी दखलही घेतली जात नाही. हाच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? असा संतप्त सवाल ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात उपोषण सुरू केलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. या पाच दिवसात त्यांनी पाणी सुद्धा घेतलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच सरकारशी बोलून तोडगा काढण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
हे शिष्टमंडळ गेल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी मीडियाशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटलांना रेड कार्पेट टाकलं जातं आणि ओबीसींच्या आंदोलनाची दखलही घेतली जात नाही. फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र असा आहे का? हा सामाजिक न्याय आहे का? हाच पुरोगामी महाराष्ट्र आहे का? असा सवाल करतानाच या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.
ओबीसींची अनेक आंदोलने झाली. सावित्रीमाई फुलेंच्या जन्मगावीही आंदोलन केलं. त्यावेळी सरकारच्या स्थानिक प्रतिनिधीनेही या आंदोलनाची दखल घेतली नाही. चौंडी आणि भगवानगडाजवळही ओबीसींनी आंदोलन केलं. त्याचीही सरकारने दखल घेतली नाही. हे सरकार ओबीसींचं नाही का? आमची लोकसंख्या 60 टक्के आहे. तरीही आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. सरकार फक्त ठरावीक लोकांचं आणि वर्गाचं आहे काय? लोकप्रतिनिधी असं करत असतील तर जायचं कुठे? म्हणून अंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रीत आंदोलन सुरू केलं आहे, असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे गेल्या सात आठ महिन्यापासून सांगत आहेत की ओबीसी आमचे बंधू आहेत. ओबीसी बांधवांच्या वाहनात पेट्रोल टाकून आम्ही प्रवास करतो. आमच्यात भाईचारा आहे. असं असेल तर मनोज जरांगे ओबीसी नेत्यांवर टीका का करतात? ओबीसी नेत्यांना टार्गेट का करतात? बलुतेदार आणि आलुतेदारांचे हक्क का हिरावून घेत आहेत? त्याच्या पालात तुम्ही का घुसत आहात? मग तुम्ही ओबीसींचे मित्र कसे असू शकता?; असा सवाल त्यांनी केला.