औरंगाबाद: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात असं विधान राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र अब्दुल सत्तार यांना फटकारलं आहे. युतीचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. सत्तार यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना फटकारलं आहे. त्यामुळे युतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेतच जुंपल्याचं चिन्हं दिसत आहे.
शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतच बोलू शकतात. तसेच युतीबाबतचा निर्णय फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. तेच निर्णय घेतील. युती होणार की नाही याबाबत हे दोनच नेते सांगू शकतील. सत्तार ओघाओघाने बोलले असतील. पण त्यांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. मंत्री असताना अशा पद्धतीने विधान करणं चुकीचं आहे, असं खैरे म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे काम करत आहे. आमचं सरकार पाच वर्ष काम पूर्ण करेल, असं सांगतानाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना टोला लगावला. भागवत कराड यांना आणखी दिल्ली कळलेलीच नाही. दिल्लीत मी सर्वात जास्त काळ काम केलेलं आहे. भागवत कराड यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भागवत कराड यांना कुण्याही बँकेच्या चेअरमन आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यास बंधन घातलं आहे. त्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी शक्तिप्रदर्शनावरही भाष्य केलं. आमच्या सगळ्याच नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शहरात मोठे होर्डिंग लावले आहेत. सगळ्यांचाच वाढदिवस आम्ही जल्लोषात साजरा करतो. माझ्या वाढदिवसाला झालेली बॅनरबाजी हे काही शक्तिप्रदर्शन नाही तर आमचा हा जल्लोष आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात, दुपारी रायपूरमधून पुण्यात आणलं जाणार
Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?