औरंगाबाद: भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. भाजपने मिशन 144ची सुरुवात केली आहे. आजपासून या मिशनला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा औरंगाबादमध्ये येत आहे. औरंगाबादमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होत आहे. मात्र, मराठवाड्यातून होणाऱ्या या मिशनमधून मुंडे भगिनींना डावलण्यात आलं आहे. जेपी नड्डा यांची आज औरंगाबादेत सभा होत असून या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपने मुंडे भगिनींना आपल्या या मिशनमधून दूर ठेवलं असून आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंडे भगिनींचा काहीच रोल नसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची उपेक्षा सुरूच आहे. मराठवाड्यात होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांना वगळण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे केवळ पंकजा मुंडे यांनाच नाही तर त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनाही या कार्यक्रमातून वगळण्यात आलं आहे. दोन्ही मुंडे भगिनींचं नावच कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने मुंडे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. तसेच भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आहे.
औरंगाबादमध्ये कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाला मराठवाड्यातील नेत्यांना पाचारण करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत आहे. मात्र, मराठवाड्याच्या नेत्या असूनही पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज दुपारी 4 वाजता जेपी नड्डा यांची सभा होणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत या सर्वांची नावे आहेत. मात्र, मराठवाड्यात होत असलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेवर एकाही महिला नेत्याचं नाव नसल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, भाजपच्या “मिशन 144” ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपूरातून करणार आहेत. आज 2 जानेवारीला जे पी नड्डा चंद्रपूर दौऱ्यावर येताहेत.
नड्डा चार्टर्ड विमानाने सकाळी 11 वाजता चंद्रपुरच्या मोरवा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे.
या सभेनंतर नड्डा भाजपच्या ‘लोकसभा टीमशी’ साधून औरंगाबादसाठी रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असतील.
मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्याकडे बघितले जात आहे.
याआधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनाविषयक विविध मुद्द्यांची हाताळणी केली होती.