परभणीः सिनेकलावंत सयाजी शिंदे (Sayaji Shinde) त्यांच्या अस्सल अभिनयासाठी जसे प्रसिद्ध आहेत, तसेच त्यांच्या झाडांबद्दलच्या प्रेमासाठीही ख्यात आहेत. सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उपक्रम राबवत असतात. तसेच ज्या ठिकाणी झाडांची कत्तल होते, त्याठिकाणी स्वतः पुढाकार घेत ही कारवाई थांबवण्याचे प्रयत्न करतात. त्यांनतरही झाडांची कत्तल होत असेल तर ते अशी झाडं दत्तक घेतात. परभणीत एका चित्रपटाच्या शूटिंगच्या (Film Shooting) निमित्ताने आज सयाजी शिंदे पोहोचले असता, तेथेही त्यांची झांडांप्रतीचं प्रेम दिसून आलं. गंगाखेड-परळी महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात तोडली जाणारी वडाची जुनी दोन मोठी झाडं त्यांनी रिप्लांट करण्याचं ठरवलं असून ती दत्तक घेतली. या झाडांना पाहण्यासाठी ते दिवसातून तीन वेळा जातात. काल या झाडांना पाहण्यासाठी गेलेल्या सयाजी शिंदे यांना आणखी एक वृक्षप्रेमी शेतकरी भेटला. सयाजी शिंदे यांनी शेतकऱ्याची समस्या ऐकून घेत त्याच्या घरालाही भेट दिली आणि 10 झाडं लागवडीसाठीदेखील दिली.
सयाजी शिंदे हे दत्तक घेतलेली झाडं पहायला जात असताना त्यांना बनपिंपळा येथील इंग्रजित कोरके नावाच्या तरुणाने गाठले. कोरके यांच्या शेतातून रस्ता जात असल्याने तेथील कडुनिंब आणि जांभूळ ही दोन मोठी झाडं वाचवण्यासाठी त्यानं सयाजी शिंदे यांना आग्रह केला. झाडाबद्दलचं इंद्रजित यांचं प्रेम आणि आत्मीयता पाहून सयाजीराव शिंदे आनंदित झाले. त्यानंतर भर दुपारी एक वाजता सयाजी शिंदे स्वतः ड्रायव्हिंग करत बनपिंपळा येथील त्याच्या शेतात झाड पाहून आले. त्यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. सयाजी शिंदे यांनी स्वतःहून आपल्या झाडासाठी प्रयत्न केल्याचे पाहून इंद्रजितदेखील भारावून गेले.
इंद्रजित कोरके यांच्या शेतातील झाडं पाहून आल्यानंतर सयाजी शिंदे यांनी कोरके यांच्या घरीही भेट दिली. कोरके यांच्या आईची भेट घेतली. त्यांच्याशीदेखील मनमोकळ्या गप्पा मारल्या. एवढा मोठा सिने कलावंत स्वतः हुन आपल्या घरी आल्याच बघून इंद्रजित आणि त्याचे कुटुंबीय भारावून गेले. सयाजीराव यांनी 10 वेगवेगळी वृक्ष भेट देत ही झाडं लावून त्याच संगोपन करण्याचे आवाहन कोरके कुटुंबियांना केले.