आम्ही ज्यावेळी ही यात्रा काढली त्यावेळी बरीच नावे ठेवली गेली. स्वतःला काहीसुचत नाही म्हणून दुसऱ्यावर टीका केली जाते हे मी गेली 40 वर्ष बघत आहे. यामध्ये आंबेडकरी चळवळीतील बांडगुळ सर्वात आघाडीवर असतात हे लक्षात घ्या. ही बांडगुळं पाकिटछाप बांडगुळं आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर आरक्षण बचाव यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधताना ही टीका केली.
आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे त्याला राजकीय वळण लागू नये. यासाठी आम्ही आधीपासून प्रयत्न करत होतो. ही आरक्षण बचाव यात्रा जेव्हा नियोजित केली, ती पक्ष म्हणून नाही तर सामाजिक जबाबदारी म्हणून राहिली पाहिजे, त्याला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आपल्याला इथून पुढे लढाई जिंकायची असेल, तर आपल्याला 100 ओबीसी आमदार निवडून आणावे लागतील. आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका न घेतल्याने समाजानेच भूमिका घेतल्या आहेत. आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका घेतली असती तर गावागावांतील समाजात फूट पडली नसती. मी खात्रीने सांगतो की, जरांगे पाटील यांनी जरी म्हटलं की, मी निवडणूक लढतो तरी हे राजकीयच भांडण असेल, सामाजिक होणार नाही, असं आंबेडकर म्हणाले.
या आरक्षण बचाव यात्रेचे फलित काय असेल, तर छगन भुजबळ म्हणाल्याप्रमाणे 1977 ची परिस्थिती आणि शरद पवार म्हणाल्याप्रमाणे मणिपूरसारखी परिस्थिती इथे होऊ शकत नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितलं.
जरांगे पाटील यांना जेव्हा मी भेटलो तेव्हाही त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा नव्हता आणि आजही नाही. मी तेव्हाही सांगत होतो की, तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षण मागत आहात त्या पद्धतीने मिळणारच नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न मंडल आयोगामध्ये आला होता तेव्हा मराठा समाजातील जो वर्ग होता तो फरक करायला तयार नव्हता. जरांगे पाटील यांना निवडणुकीत भाग घेऊद्या. ती चांगली गोष्ट असेल महाराष्ट्र 169 कुटुंबातून मुक्त होईल असे ॲड. आंबेडकरांनी नमूद केले.