मुंबई : उद्याच्या सभेसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) आज औरंगाबादेत (Aurangabad) दाखल झाले आहेत. सभेने आधीच वातावरण टाईट केले आहे. अशातच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे खासदार इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीला औरंगाबादेत पोहोचले. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाल्या. त्याच्या आधी काही वेळच शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंचा पुन्हा नवहिंदू ओवैसी असा उल्लेख केला होता. यावेळी याबाबत ओवैसी यांना विचारले असता, असदुद्दीन ओवैसी यांनीही जोरदार टोला लगावाल आहे. हे दोन भावांचं भांडण आहे. संजय राऊत त्यांच्या नैराश्यातून हे बोलत आहेत. त्यांनी दोन भावांना समोर बसवून हे भांडण सोडवावं, उगाच असे बोलत फिरू नये, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. राज्यात सध्या औरंगाबदच्या राज ठाकरेंच्या सभेवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेना नेत्यांनी मात्र ही भाजपची बी आणि सी टीम आहे, असा उल्लेख एमआयएम आणि मनसेचा केला आहे.
राज ठाकरे यांच्या विषयावर हा फक्त दोन भावांचा भांडण आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, पण कायदा सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. असेही ओवैसी म्हणाले आहेत. तर शहराच्या मध्यवर्ती भागात परवानगी दिली पण ही परवानगी शहराच्या बाहेर द्यायला पाहिजे होती, ही परवानगी देणं ही सरकारची चाल आहे, असा आरोप यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे सध्या या सभेवरून दोन्ही बाजुने जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
तुम्ही कुणाला सभेला परवानगी देत असाल तर तिथे कायदा आणि सुव्यस्था राखण्याची तुमची जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की ते ती जबाबदारी निभावतील. तसेच आम्हाला पंचिंग बॅग बनवायची कुणाची हिंमत नाही. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आता हिंदुत्वाच्या विचारधारेवरून रेस सुरू आहे. सर्वांना यात आपण पुढे असल्याचे दाखवायचे आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्था बिघडली नाही पाहिजे. ही महाविकास आघाची जबाबदारी आहे. आपलीही ती जबाबदारी आहे, मात्र पहिली जबाबदारी सरकारची आहे, असेही ओवैसी यांनी बजावले आहे. भाजपकडून द्वेश पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच नियमांवर बुलडोजर भाजप सरकारं फिरवत आहेत. मुस्लिम लोकांना त्या ठिकाणी सजा दिल्या जात आहेत.भाजपला पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. थोडे मुस्लिम खवळले तर काय होईल हे एका मोठ्या अधिकाऱ्याने लिहिले आहे. यावर पंतप्रधानांनी मौन सोडले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.