औरंगाबाद : आज संपूर्ण राज्याचे लक्ष हे औरंगाबादकडे (Aurangabad) आहे. कारण औरंगाबादेत भगवं वादळ पोहोचलंय. म्हणजेच राज ठाकरे (Raj Thackeray) औरंगाबादेत दाखल झालेत. राज ठाकरेंच्या सेभेसाठी या ठिकाणी जोरात तयारी करण्यात आलीय राज ठाकरे ज्यावेळी औरंगाबादेत पोहोचले, त्यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर यावेळी भगवी शाल परिधान करून त्यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र आता एका दुसऱ्या प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. कारण औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी इफ्तार पार्टीला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) पोहोचल्याचे दिसून आले. इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं होतं. राज ठाकरे औरंगाबादेत असतानाच ओवैसी इथे पोहोचल्याने अनेक चर्चांणा उधाण आले आहे. विरोधकांकडून याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना नेत्यांनी मात्र यावर सडकून टीका केलीय. हा योगायोग नव्हे असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. आम्ही याला योगायोग म्हणत नाही. आता ए टीम, बी टीम, सी टीम, हे दाखल झाले आहेत. म्हणून आम्ही यांना अशी नावं ठेवली आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आता हे निश्चित झालं आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. वेगवेगळे धार्मिक मुद्दे काढण्याचा हा प्रयत्न आहे. नवनीत राणा जेलमध्ये बसल्या आहेत. हे बाकी सगळे बाहेर आहेत. मात्र आम्ही खंबीर आहोत, असे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या. हे सर्व टेंपररी आहेत. यांना जास्त गांभीर्यांने घ्याचे नाही. राज ठाकरे यांचा मनसे पक्ष कुठे होता. किती आमदार निवडूण आले होते, एक महापालिका होती, नगरसेवक होते, आता काही उरलं नाही. त्यामुळे यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
लोकं गंमत बघायला येतात, डोंबाऱ्याचा खेळ असतो रस्त्यामध्ये लोक बघायला येतात आणि निघून जातात. पण दुसऱ्या दिवशी लोकांना महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस यावर ते काही बोलणार आहेत का? त्यामुळे लोक जातील डोंबाऱ्याचा खेळ बघतील आणि परत येतील, असेही मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. त्यामुळे राजकारण जोरदार तापलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ढ म्हटलं मात्र मनिषा कायंदे यांनी मनसेला सी टीम म्हणून प्रमोशन दिलं. आणि भाजप एक नंबर आहे हे मान्य केले त्याबाबत त्यांचे धन्यवाद, अशी खोचक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच तुम्ही भ्रष्टाचार केला, महाराष्ट्राची बदनामी केली, त्यामुळे तुम्ही इतरांना बोलू नका, असेही ते म्हणाले.