औरंगाबादः समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) तरुणाने गोळीबार केल्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते महामार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर काही दिवसातच एक तरुण हातात बंदूक घेऊन गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र या व्हिडिओतील (Video) बंदूकबाज नकली असल्याचं उघड झालंय. व्हिडिओत वापरलेली बंदूकदेखील खोटी असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून उघड झालंय.
चंद्रकांत उर्फ बाळू गायकवाड असं या नकली बंदूकबाज आरोपीचं नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री पोलिसांनी या बंदूकबाजाला बेड्या ठोकल्या आहेत. खेळण्यातली बंदूक वापरून त्याने व्हिडिओ तयार केला. तसंच स्पेशल इफेक्ट वापरत एडिटिंगच्या माध्यमातून व्हिडिओ तयार केला.
नागपूर ते मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडल्यानंतर काही दिवसातच मार्गावरील औरंगाबादमधील फुलंब्री जवळील बोगद्याच्या जवळचा व्हिडिओ समोर आला होता.
या व्हिडिओत काळ्या रंगाची स्कॉर्पियो गाडी दिसते. त्या गाडीच्या पाठीमागून एक तरुण हाती बंदू घेऊन येताना दिसतो. गाडीच्या पुढे येताच तो आकाशाकडे बंदूकीची दिशा करून हवेत गोळीबार करताना दिसतो.
महामार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने असा व्हिडिओ तयार करणं अत्यंत गंभीर स्वरुपाचं आहे. त्यामुळे व्हिडिओवर चहुबाजूंनी टीका सुरु झाली होती. औरंगाबादच्या फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फुलंब्री पोलिसांच्या तपासानंतर व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणाचा शोध लागला. हा नकली बंदूकबाज असल्याचं उघड झालंय.
नागपूर ते मुंबई महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या शहरातील अंतर 16 तासांवरून 8 तासांवर आले आहे. या महामार्गावर वाहन चालकांसाठी ताशी 120 किलोमीटर एवढ्या वेगाची परवानगी देण्यात आली आहे.