औरंगाबाद | 31 ऑगस्ट 2023 : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत. लालू यादव यांचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. लालू यादव यांनी मुंबईत येताच भाजपवर आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. लालू यादव यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नरडीवर बसायचं आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या विधानावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीतील मुंबईतील बैठक म्हणजे गंमत आहे. लालू प्रसाद यादव म्हणतात मला मोदींच्या नरडीवर बसायचं आहे. मात्र ही मुंबई आहे. इथून तिरडीवरच जातील, असा इशारा देतानाच यांचा एकच कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. तो म्हणजे मोदी हटाव, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
शरद पवार हे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केले असेल तर चौकशी केली पाहिजे. होय, चौकशी होणार आहे. काल शरद पवार यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसले होते. म्हणून पवार तसे म्हणाले नाही ना? असा प्रश्नही आम्हाला पडला आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
काल एक नेता म्हणाला मुंबई तोडणार. मुंबई तोडायची कुणाच्या माईच्या लालची हिंमत आहे? हिटलरच्या गोबेल्ससारखी ही नीती आहे. हे सगळं सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवार यांनी आराम करावा ही त्यांच्या पक्षाच्या लोकांचीही इच्छा होती. पण अनेकांना मोह सुटत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत काम केलं आहे. त्यांनी माफी मागावी. तसेच भारतरत्न परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्याबाबत मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं. त्यावर भारतरत्न परत घेता येत नसतो. मला यावर एवढंच बोलायचं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फायली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नजरेखालून जाणार असल्याची माहिती आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. फायलींचा प्रवास अंकुश ठेवण्यासाठी नाही. समन्वय असावा म्हणून फाईल या ठिकाणाहून प्रवास करून त्या ठिकाणावर जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.