नांदेड : रत्नागिरीतील खेड येथे झालेल्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार भाषण केलं. पण रामदास कदम यांच्या या भाषणाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यासारख्या वाघाला पाळलं होतं. तुम्ही शेळ्या मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यात आणि बाळासाहेबांमध्ये फरक आहे, असं रामदास कदम म्हणाले होते. त्यांच्या याच विधानाची सुषमा अंधारे यांनी खरपूस खिल्ली उडवली आहे. वाघाला पाळत नसतात. कुत्री, मांजरं पाळत असतात, असा खोचक टीका सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर केली आहे. मुखेड येथे महाप्रबोधन यात्रेला त्या संबोधित करत होत्या.
वाघ पाळत नसतात. तर कुत्रे, मांजरं पाळतात, असा टोला लगावतानाच रामदास कदम यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. त्याचे अर्थ त्यांना कळाले नाही. वाघ कधी रडत नाही. इतकी संकट आली पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कधी रडले नाहीत. मग स्वत:ला ढाण्या वाघ म्हणवून घेणारे रामदास भाई का रडत आहेत? असा हल्लाबोलच सुषमा अंधारे यांनी केली.
यावेळी त्यांनी मुखेडमधील स्थानिक आमदारावरही जोरदार टीका केली. स्थानिक आमदार गुत्तेदारीत व्यस्त आहे. माझा आवाज इतकाच आहे. तुम्ही जरा एक ग्लास कमी घेतला असता तर आवाज ऐकू आला असता. महाराष्ट्रभर फिरतेय त्यामुळे कोण कसं बोलतं ते कळतं, असा टोला त्यांनी उपस्थितांपैकी एकाला लगावला. यावेळी त्यांनी आमदार सुभाष साबणे यांचं एक पत्र दाखवत त्यांच्यावर टीका केली. मरेपर्यंत मी शिवसेनेला विसरणार नाही. साहेब मी एकवेळ आत्महत्या करेल पण शिवसेना सोडून कुठेच जाणार नाही, असं या पत्रात त्यांनी म्हटलं होतं. मग ते आता जिवंत आहेत काय?, असा संतप्त सवाल अंधारेय यांनी केला.
शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मॉर्फ व्हिडीओवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच्या सोशल मीडियावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हे सगळं ठरवून होत आहे. 40 लोक ट्रोल होत आहेत अशी शंका आहे. या प्रकरणावर सर्वसामान्य लोक लिहीत आहेत. तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. व्हिडीओ व्हायरल करणं गुन्हा नाही. तरीही 354 A चे 2014 आयटी अॅक्ट लावण्यात आले, असं त्यांनी सांगितलं. तसेच या दोन्ही कलमाच्या व्याख्याही सांगितल्या.
सेक्श्युअल कंटेंट व्हायरल केला म्हणत गुन्हा दाखल केला. याचा अर्थ पोलिसांच्या म्हणण्यानुसार गाडीवरील त्या दिवशीची घटना म्हणजे सेक्श्युअल कंटेट आहे. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करण हा गुन्हा आहे. त्यामुळे त्या आमदारावर कलम 294 नुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी मागणी करतानाच कायद्याची बूज राखायची ज्यांच्यावर जवाबदारी आहे ते तसं करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.