औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोरी कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रदीप सोळुंके (Pradeep Salunke) हे सकाळपासून नॉट रिचेबल होते. अर्ज मागे घेण्याचा वेळ संपल्यानंतर हे अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. यासंदर्भात प्रदीप सोळुंके म्हणाले, मी बंडखोरी केलेली नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. संधी मिळत नसेल, तर संधी खेचून आणली पाहिजे, हा पवार साहेब यांचा आदेश आहे. त्या आदेशाचं मी पालन करतो. १४ वर्षे झालीत. काळे आमदार आहेत. त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. पक्षाची तिकीट द्यायची इच्छा नव्हती. पण, त्यांनी काय जादू केली हे मला माहीत नाही. सिटींग आमदार असल्यानं त्यांना तिकीट द्यावं लागलं असेल. मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, तुम्ही आमचे प्रतिनिधी व्हा.
कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून फार्म भरला. संधी खेचून आणायच्या प्रक्रियेला बंडखोरी म्हणतात, असं म्हटल्यावर त्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही द्या. मी शहाजी राजे वाचले. वेळ पडला तर राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात. माझे लाईव्ह व्याख्यानं पण आहेत. अनेक मोठ्या नेत्यांनी संधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पायंडा मी पुढं चालविणार आहे, असं प्रदीप साळुंके यांनी सांगितलं.
माझी उमेदवारी ही माझ्या पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न आहे. मी आमदार काळे यांना आव्हान केलं होतं की, तुम्ही पक्ष वाढविला आहे का. मला भेटावं. मी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. त्यांनी पक्ष कुठंच वाढविला नाही. शरद पवार यांच स्वप्न पूर्ण होणार कसं. त्यासाठी माझ्यासारखे सज्जे कार्यकर्ते पुढं आले पाहिजे.
उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी प्रयत्न केले. स्थानिक नेत्यांनी विनंत्या केल्या. फोन करण्याचे प्रयत्न केले. त्यांचे मी आभार मानतो. पण, त्यांना माहिती आहे प्रदीप साळुंके हा सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षासाठी नोकरी सोडली. मी पक्ष बांधणीचं काम केलं. माझी कुठं संस्था नाही.