शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकरी पती-पत्नी गंभीर जखमी होतात…. वीज कोसळल्याचीॉ घटना बैलासमक्षच घडते… मालक जगण्यासाठी दोन हात करतोय हेच त्या मुक्या जनावराच्या लक्षात आलं. आणि त्याने त्यांनी थेट बैलगाडीचा जू स्वतःच्या खांद्यावर घेत या दोन्ही शेतकरी पती-पत्नीचे प्राण वाचवले… अंगावर शहरा येणारी घटना बीडच्या लोणी घाट इथली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात या दोन बैलांची चर्चा रंगत आहे.
लाडक्या बैलाला गोंजारणारे हे आहेत विभीषण कदम. मृत्यूच्या दाढेतून याच बैलाने विभीषण आणि त्यांच्या पत्नीला बाहेर काढलं. वेळ आला होता मात्र काळ आला नव्हता याचाच प्रत्यय या बैलाने दाखवून दिला. 5 जून रोजी बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसात वीज कोसळली. यात विभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीरित्या जखमी झाल्या. अर्धा तास हे दोघेही पती-पत्नी बेशुद्ध पडले होते. जेव्हा विभीषण आणि त्यांच्या पत्नीला शुद्ध आली तेव्हा ते कसेबसे बैलगाडीवर चढण्याचा प्रयत्न करत होते. याच वेळी बाजूला असलेला प्रधान आणि राजा ( दोन बैलांची नावे) मालक अडचणीत असल्याचे पाहून दोघेही धावून आले. विभीषण यांनी “‘चल आता घरी सोड” असे म्हणताच लाडक्या राजाने गुडघ्यावर बसून जू स्वत:च्या मानेवर घेतलं आणि प्रधानच्या साथीने तब्बल साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी मालकाला सुखरूप नेऊन सोडलं.
तिथं गेल्यावर लाडक्या राजाने जोरात हंबरडा फोडला. यावेळी विभीषण यांचा मुलगा आणि सून धावून आले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं अन् त्यांचा प्राण वाचला. मुक्या जनावरांच्या या सतर्कतेमुळे या दोन्ही पती-पत्नीचा जीव वाचला. राजा आणि प्रधान नसते तर आमचा मृत्यू अटळ होता असं सांगत दोघाही पती-पत्नींना अश्रू अनावर होतंय.
विभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीवर तब्बल दीड महिना रुग्णालयात उपचार सुरू होता. बैलाने दाखवलेला प्रसंगावधान पाहून गाव परिसरात चर्चा सुरू झाली आहे. याचीच व्यथा गावातीलच स्थानिक पत्रकाराने सोशल माध्यमातून मांडली. त्यानंतर विभीषण कदम आणि त्यांच्या बैलांना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी गर्दी केली.