औरंगाबादः शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका (Aurangabad municipal corporation) जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या परवानगीने धरणातून पाणी उपसा करते. यासाठी महापालिकेला पाटबंधारे विभागाला ठराविक रक्कम पाणीपट्टी म्हणून द्यावी लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने पाणीपट्टीच (water bill) भरलेली नाही. हा आकडा वाढत जाऊन आता कोट्यवधींच्या घरात गेला आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी पट्टी भरली नाही तर 21 फेब्रुवारीपासून टप्प्या-टप्प्याने पाणी उपसा बंद केला जाईल, असा इशारा पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आला होता. त्यामुळे शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठ्यावर (Water supply) परिणाम होण्याची चिन्ह होती. मात्र अखेर औरंगाबाद मनपाने काही प्रमाणात पाणीपट्टी भरली असून शहरावर घोंगावणारे संकट दूर सारले आहे.
औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी येथील नाथसागरातून पाणीपुरवठा होतो. नाथसागरातून पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर 2015 मध्ये जलसंपदा विभागाशी करारनामा केला, या करार नाम्याची मुदत 31 ऑक्टोबर 2021 रोजी संपली. मुदत संपल्यानंतरही महापालिकेने करार नाम्याचे नूतनीकरण केले नाही. त्याप्रमाणेच डिसेंबर 2021 पर्यंत पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी महापालिकेने भरलेली नाही. महापालिकेकडे पाणीपट्टीपोटी 26 कोटी 32 लाख 23 हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने महापालिकेला संपुष्टात आलेल्या करारनाम्याचे त्वरीत नूतनीकरण करण्यात यावे, थकीत पाणीपट्टी त्वरीत भरावी, असा उल्लेख करत नोटीस बजावली होती. थकबाकी न भरल्यास औरंगाबदाचा पाणीपुरवठा टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येईल, असा इशाराही पाटबंधारे खात्याने दिला होता.
दरम्यान, औरंगाबाद महापालिकेने जायकवाडी पाटबंधारे विभागाला 50 लाखांचा धनादेश दिला आहे. दर महिन्याला काही प्रमाणात रक्कम भरून उर्वरीत थकबाकी दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. यावर पाटबंधारे विभागाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शहरात सुरु असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेवरून भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सरकारला इशारा दिला आहे. 2020 साली सुरु झालेल्या या योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. आगामी काळात योजनेच्या कामाने वेग घेतला नाही तर दिलेल्या मुदतीत योजना पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची हेळसांड सुरुच राहील, असा आरोप करत, येत्या काही काळात पाणीपुरवठा योजनेवरून आंदोलन करणार असल्याचा इशारा डॉ. कराड यांनी दिला आहे.
इतर बातम्या-