औरंगाबाद: विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांना पाडण्यासाठी भाजप पूर्ण ताकत लावणार आहे. मला तर हे पण माहिती की एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देण्यासाठी भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार होती, असा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच जलील यांच्या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. विधान परिषद निवडणुकीत भाजपचं मुख्य टार्गेट काँग्रेसचे भाई जगताप नसून एकनाथ खडसे आहेत काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यामुळे खडसे यांना या निवडणुकीत जपून पावलं टाकावी लागणार आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे एक आमदार खडसे यांना मतदान करणार असल्याची जोरदार चर्चाही रंगली आहे.
इम्तियाज जलील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. इतकेच नव्हे तर विधान परिषदेचा निकाला अत्यंत धक्कादायक असतील असंही त्यांनी सांगितलं. भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. केवळ पैशाच्या ताकदीवर हे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. पैसा आणि केंद्रीय यंत्रणांची ताकत आहे. त्यांच्या जीवावर पाचवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे येणारे निकाल अत्यंत धक्कादायक असतील, असा दावा जलील यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना आम्ही मतदान करणार असल्याचं जलील यांनी जाहीर केलं आहे. हंडोरे यांनी दलित समाजासाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आहोत. तसेच दुसऱ्या मताबाबत उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एमआयएमचं मत भाई जगताप यांना मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. अयोध्येचा दौरा ही पूजा नव्हती, तर फक्त गाजावाजा होता. मी पण तीन महिन्यांपूर्वी उमरा येथे आमच्या श्रद्धास्थानी गेलो होतो. पण गाजावाजा केला नाही. आदित्य ठाकरे यांचा दौरा हा प्रॉपर प्लॅनिंग करून मीडिया पब्लिसिटी केलेला गाजावाजा केला होता, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. ईडीकडे काहीतरी मुद्दा असेल म्हणून तर ही चौकशी सुरू आहे. याचा विरोध करण्याचे काहीच कारण नाही. चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होऊ दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.