औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) म्हणाले, राजकारणात (Politics) काहीही अशक्य नसते. देशात वेगवेगळ्या प्रकारच्या आघाडी, युती झाल्या आहेत. आमच्याकडंही काही सरप्राईज पॅकेजेस असतील. इम्तियाज जलील हे या पक्षात जाणार. हा पक्ष जॉईन करणार, अशा चर्चा सुरू असतात. पण, एमआयएमचे ओवैसी यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. विचाराला घेऊन मी एमआयएम पक्ष जॉईन केला आहे. किती वर्ष तुम्ही मुसलमानांचा रबर स्टॅम्प म्हणून वापर करणार, असा सवालही जलील यांनी केला.
इम्तियाज जलील म्हणाले, मला काहींनी सांगितलं होतं की, राष्ट्रवादीचे शरद पवार हे काही बौद्धिक मुसलमानांशी चर्चा करणार आहेत. ही चर्चा पुढं ढकलण्यात आल्याची माहिती आली आहे. विरोधात आल्यानंतर तुम्हाला मुसलमान का आठवतात. सत्तेत असताना तुम्हाला मुसलमानांची आठवण का येत नाही, असा सवालही त्यांनी विचारला.
तुम्ही मुसलमानांना सत्तेत असताना का बोलावत नाहीत. ५० लोकांना बोलावत असाल तर मीपण येतो. मी बौद्धिक नाही. पण, लोकांमध्ये जाणारा. मुसलमान लोकांची काय समस्या आहे, याची मला जाणीव आहे, असंही जलील यांनी सांगितलं.
स्वतःची वा वा करण्यासाठी ते बौद्धिक मुसलमानांची बैठक घेत असतील, तर ते योग्य नाही. मलाही लोकांच्या अडचणी माहीत आहेत. मुसलमानांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. सत्तेत असताना मुसलमानांच्या बाबतीत काही करत नाही.
छोटे-छोटे इंडस्ट्रीयल प्लाट आपण मुसलमानांसाठी का तयार करू शकत नाही. मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास कसा होईल, असा सवालही जलील यांनी विचारला.
काहीही असू द्या. मैदानात कोणालाही येऊ द्या. आम्ही निवडणूक लढायला तयार आहोत. आपण चांगलं काम करत आहोत. लोकांना पटलं तर ते पुन्हा निवडून देतील, अशी अपेक्षा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.