मुगल बादशाह औरंगजेबचा (Emperor Aurangzeb) मृत्यू नगरला झाला. गाव भिंगर. तारीख होती 3 मार्च 1707. मृत्यू जरी नगरला झाला तरी त्याचं दफन मात्र त्याच्याच इच्छेनुसार खुलताबादला करण्यात आलं. तिथंच अजूनही बादशाहची कबर आहे. ही औरंगजेबाचीच (Aurangzeb) इच्छा होती की त्याला, त्याच्या गुरुजवळ दफन करण्यात यावं. त्या गुरुचं, संताचं नाव शेख झेनुद्दीन. त्यांच्या नावावर इतिहासात मतभेद दिसतात. खुलताबादमध्ये जो दर्गा आहे त्यावर मात्र बुऱ्हानुद्दीन अवलिया असं नाव आहे. याच दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi ) गेले आणि औरंगजेबाच्या कबरीवरही फुलं चढवून आले. त्यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी प्रकरण उडवून लावण्याचा प्रयत्न केला पण यानिमित्तानं हिंदुत्वाची धार आणखी तीव्र करण्याची संधी इतर पक्षांना मिळाली हे मात्र निश्चित. औरंगजेब किती क्रूर होता याचे ऐतिहासिक दाखले ठिकठिकाणी आहेत. इतिहासाची पुस्तकं जशी मराठ्यांच्या कर्तृत्वानं भरलेली आहेत तशीच औरंगजेबाच्या कारवायांनीही भरलेली आहेत. ज्या मोगल सम्राटाचं साम्राज्य काबूलपर्यंत होतं, त्याचा शेवट मात्र महाराष्ट्राच्या मातीत झाला. मराठ्यांनी औरंगजेबाचा शेवटचा काळ अत्यंत हलाखीचा करुन सोडला.
औरंगजेब अतिशय खडतर आयुष्य जगला. त्याचं आयुष्य रणांगणात गेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तो कधीही एका ठिकाणी स्थिर असायचा नाही. शहरांमध्ये रहाणे त्यानं कधी पसंत केलं नाही. सुखासिन आयुष्याला त्यानं तिलांजलीच दिली होती. तो 90 वर्षांचं मोठं आयुष्य जगला. महालात राहिला पण फकिरासारखं जगला. त्यानं राज्यकारभारासाठी आयुष्यभर मोठा पत्रव्यवहार केला पण त्याची शेवटच्या दिवसातली तीन पत्रं ऐतिहासिक आहेत आणि कायम चर्चेत असतात. त्याचं शेवटचं आयुष्य किती एकाकी, दु:खी, करुण अवस्थेत गेलं ते दाखवणारी आहेत. त्यातलं जे शेवटचं पत्रं आहे ते त्याचं मृत्यूपत्रं समजलं जातं. ते त्यानं स्वत: लिहिलं आणि त्याच्या मृत्यूनंतर ते उशाखाली सापडल्याची नोंद अनेक इतिहासकार करतात. त्या शेवटच्या पत्रात त्यानं खरं त्याच्यानंतर मोगल साम्राज्याचं काय करावं याच्या स्पष्ट सुचना आहेत. त्यातल्या काही सुचना तर त्याचे सेवक, त्यानं विनलेल्या टोप्या यासंदर्भातल्या आहेत.
औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात एकूण 12 सुचना, इच्छा आहेत. त्यातली शेवटची जी सुचना आहे त्यात शिवाजी महाराजांबद्दल जी चूक केली त्यासंदर्भातली आहे. औरंगजेब म्हणतो-राज्यप्रमुखाला राज्यातली खडानखडा माहिती असावी. तोच त्याच्या कारभाराचा आधार समजला जातो. एक क्षणभर बेसावध राहिलोत तर वर्षानुवर्षे केलेले कार्य वाया जाऊ शकते. मी शिवाजीबद्दल निष्काळजीपणा केला आणि तो नजरकैदेतून पळाला. त्याचाच परिणाम म्हणून माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांशी जगण्यामरण्याचा लढा द्यावा लागला.
औरंगजेब क्रूर होता. त्यानं भावंडांच्या हत्या केल्या. बापाला डांबून ठेवलं असं इतिहास सांगतो. औरंगजेबानं असं कसं केलं असेल असा सर्वसामान्यांना कायम प्रश्न पडत आलाय. खरं तर त्याच्या या क्रौर्यामुळेच त्याला अजूनही आदर मिळत नाही. एमआयएमच्या नेत्यांनी त्याच्या कबरीवर फुलं वाहिली, ती वादग्रस्त ठरली त्याला कारणही औरंगजेबाचा कारभारच आहे. पण तो असा का वागला असेल? त्यामागे त्याचा काय विचार होता याचा अंदाज त्याच्या शेवटच्या पत्रातून मिळतो. त्यानं जी अकरावी सुचना केली त्यात औरंगजेब म्हणतो- तुमच्या मुलांवर विश्वास ठेवू नका. त्यांना जास्त जवळही करु नका. तशी चूक शहाजहानने दारा शुकोह बद्दल केली म्हणूनच तर पुढचा अनर्थ घडला. लक्षात ठेवा. राजाला कोणीही नातेवाईक नसतात.