नागपूरमध्ये काल औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून चांगलचं रान पेटलं. दोन गट आमनेसामने येऊन दगडफेक झाली आणि हिंसा उसळली. त्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र नागपूरमधील या हिसेंच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. राज्यात दंगली का घडवल्या जात आहेत ? असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या चार लोकांनी हाता कुदळ -फावडं घेऊन जावं आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार असलेल्या राऊतांनी केली.
काय म्हणाले राऊत ?
कोणाची प्रेरणा आहे, दंगली का पेटवल्या जात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केलं, राजापुरात काय घडलं , अन्य भागात काय घडलं हे माहीत आहे. होळीसारख्या सणांना कधी महाराष्ट्रात दंगल उसळली नव्हती, उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील आपलीच लोकं. काल औरंगजेबाची ढाल करून काही लोक या राज्यात हिंदू-मुसलमान दंगल पेटवत आहेत. बाबरीचं उदाहरण देत आहेत, बाबरीप्रमाणे आम्ही महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू म्हणत आहेत. सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत ना, दंगली कशाल घडवताय , सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. तुमच्याच विचारांचं सरकार आहे ना , मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या चार लोकांनी हाता कुदळ -फावडं घेऊन जावं आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, असे राऊत म्हणाले.
त्यांची कबर इथेच खोदली
काय चाललंय महाराष्ट्रात. आम्ही वारंवार सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं ते मेमोरियल आहे. एक औरंगजेब इथे आला. एक अफजल खान आला, एक शाहिस्ते खान आला आणि इथून परत नाही गेला. मावळ्यांनी, संभाजी राजांनी त्यांची कबर इथेच खोदली. हे मावळ्यांच्या शौर्याचं प्रतिक आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा अशी आहे, संभाजी राजे आणि शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचं ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतिक नव्हतं आणि नाही. त्यामुळे आधी व्हिलन संपवला तर हिरो आपोआप संपवता येतो. त्यामुळे व्हिलनवर हल्ला करून महाराष्ट्रातील हिरोंना संपवा, असं राऊत म्हणाले.
हे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही
फक्त अयोध्येत श्रीराम मंदिर उभं करू. जिथे आक्रमण झालं त्या जागेवर. आमचा एका बाबरीशी संबंध आहे. बाकी कोणत्याही मशीद किंवा कबरीशी आमचा हस्तक्षेप असणार नाही. या देशात हिंदू आणि मुसलमानांनी सामंजस्याने राहिलं पाहिजे. तर हा देश आणि राज्य टिकेल ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा लढा हा राम मंदिराचा होता, त्यासाठी बाबरीचं पतन केलं. रोज उठून एक मशीद पाडायची आणि कबर तोडायची हे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही. आम्हाला दिलं नाही, असं संजय राऊतांनी नमूद केलं.
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री फेल्युअर
लोक बाहेरून येणं शक्य नाही. जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवतात, प्रचंड जाळपोळ होतोय याचा अर्थ असा आहे की गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री फेल्युअर आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेवर गर्जना करत असताना अशा प्रकारचा दंगा त्यांच्या मतदारसंघात होत असेल तर हे करणारे कोण आहेत. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. गेले दोन दिवस नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोकं समोर येऊन भडकवणारी वक्तव्य मी वृत्तवाहिन्यांवर पाहत आहे. इशारे देत आहेत. इथं बाहेरून आलेली लोकं नाहीये. त्यांची जी काही ओळख आहे, डोक्याला खूप तेल लावून, चकचकीत असं.. किती तेल.. ते नक्कीच विश्व हिंदू परिषदेचे लोकं आहे किंवा संघाचे लोकं आहेत. नागपूरचेच आहेत. चेहरे कळतात. हे चेहरे देवेंद्रजींना नक्कीच माहीत असणार कोण आहेत ते, असाही टोला राऊत यांनी हाणला.