नाशिक : कधीकाळी शिवसेनेत फुट पडलेली नसतांना हिंदुत्वाच्या मुद्दावरुन भाजपाशी दोन हात करत असतांना शिवसेनेकडून अयोध्यावारी केली जात होती. त्या दरम्यान शरयू नदीवरील आरती असो वा अयोध्या येथील सभा असो, याच्या नियोजनाची नेहमीच जबाबदारी नाशिकच्या पदाढीकऱ्यांकडे राहिली आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा असो वा आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा असो नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तो यशस्वी पार पाडून दाखविला आहे. त्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडलेली असतांना मागील महिन्यात काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अर्थातच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर नुकताच काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील काही महंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांना अयोध्या येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते स्वीकारले आहे. त्याच दरम्यान नाशिकचे पदाधिकारी असलेले ज्यांनी या आधी दोन ते तीन वेळा झालेल्या ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले आहे ते भाऊसाहेब चौधरी आणि अजय बोरस्ते हे उपस्थित होते.
भाऊसाहेब चौधरी आणि अजय बोरस्ते हे ठाकरे गटात असतांना त्यांनी शरयू नदीवर झालेली महाआरती, दर्शन आणि जाहीर सभेचे नियोजन केले आहे.
शिवसेनेकडून ज्या ज्या वेळेस अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले त्या त्या वेळी नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाण्या-येण्याची व्यवस्था सुद्धा केली होती.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी अनेकदा अयोध्या दौऱ्याच्या नियोजनावरुन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
त्यातच आता शिंदे यांच्या भेटीला आलेल्या महंतांच्या भेटी दरम्यान नाशिकचे भाऊसाहेब चौधरी आणि अजय बोरस्ते हे देखील उपस्थित होते.
त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी असणार हे निश्चित झाले आहे.
नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर अयोध्या दौऱ्याची जबाबदारी देऊन शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाऊ लागले आहे.