अहमदनगर – मशिदीवरील भोंगे खाली उतवरण्याच्या मनसेच्या (MNS)अल्टीमेटमनंतर त्याचा फटका देवस्थांनानाही बसतोय.जागितक किर्तीचे देवस्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीच्या (Shirdi)आरतीवर याचा परिणाम जाणवतोय. साईबाबांची पहाटे 5 वाजता होणारी काकड आरती तसेच रात्री १० वाजेची आरती लाऊडस्पिकर विना पार झाली आहे. तसेच मुस्लिम बांधवांनी देखील संयम ठेवत पहाटेचं अजान विना लाउडस्पीकर (Loudspeaker) केलं आहे. मनसेच्या अल्टिमेटमनंतर राजकीय वातावरण तापले असताना मशिदींसोबत याचा परिणाम हिंदू धार्मिक तिर्थस्थळांवरही होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डी साई मंदिरात तब्बल 70 वर्षानंतर विना लाउडस्पीकर काकड आरती पार पडली आहे. भाविकांची साईबाबांवर निस्सीम श्रद्धा आहे. शिर्डी ग्रामस्थही सकाळच्या काकड आरतीचा सुमधूर ध्वनी कानी पडल्यानंतर आपल्या दिवसाची सुरूवात करतात. संपूर्ण गावकोसात बाबांची आरतीचा सूर ऐकू येतो, त्यात आता खंड पडला आहे. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थामध्येही नाराजी पसरली आहे.
सर्व धर्मसमभावाचे प्रतिक असलेल्या शिर्डी नगरीत हिंदू -मुस्लिम ऐक्य पहावयास मिळते. रामनवमी उत्सवात देखील हिंदु-मुस्लिम धर्माच प्रतिक असलेल्या ध्वजांची मिरवणुक काढली जाते. तर मुस्लिम समाजाच्या वतीने साई समाधीवर फुले वाहिली जातात. मनसेच्या भोंगा आंदोलनामुळे मात्र हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा निर्माण झाली आहे. मुस्लिम समाजाने पहाटेची अजान भोंग्यावर होणार नाही मात्र साईंबाबांची काकड आरती आणि शेजारती लाऊडस्पीकरवर लावावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे अशी माहिती गणीभाई पठाण यांनी सांगितली आहे.
मुस्लिम समाजाने पहाटचे अजानचे भोंगे बंद ठेवून साईबाबांच्या आरतीला परवानगी देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी मनसे प्रमुख राज ठाकरेंचे आदेशाचे पालन करणारच अशी भुमिका मनसेने घेतली आहे. तर राज्य सरकार भोंग्याबाबत गोंधळलेलं असल्याची टिका भाजपचे प्रदेश सरचिटणीस सचिन तांबे यांनी केली आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाने साईबाबा संस्थानला सुचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार ध्वनी मर्यादा ठेवून काकड आरती तसेच रात्रीची शेजारची पार पडेल. परंपरेत खंड न पडता मार्गदर्शक सुचनांचे पालन करत आरती पार पडणार असल्याचं संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगीतलं आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छेडलेल्या मशिदीवरील भोंगा आंदोलनाला यश मिळत असले. तरी पोलिस प्रशासनाकडून मशिदीबरोबर मंदिरांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मंदिरांना सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आवाजाची मर्यादा पाळावी लागणार असुन रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतील काकड आरती , भजन , किर्तन तसेच विविध हिंदू धार्मिक-रुढी-परंपरांना देखील याचा फटका बसतोय एवढ मात्र नक्की असं पोलिस निरिक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.