एकिकडे जेलमध्ये स्वातंत्र्ययुद्धातील तीन शूरवीरांना फाशी देण्याची तयारी सुरु होती. तर दुसरीकडे जेलच्या बाहेर हजारो भारतीयांमध्ये असंतोष उफाळून आला होता. ठरलेल्या दिवशी फाशी दिली तर या असंतोषावर नियंत्रण ठेवणं कठीण होईल, हा विचार करून ब्रिटिशांनी (British) भगतसिंग, राजगुरू (Bhagatsingh, Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) या तिघांना एक दिवस आधीच फासावर चढवलं. देशासाठी प्राणांची आहुती देतानाही या तिघांच्या मुखातून भारत मातेच्या जयजयकाराच्या घोषणा येत होत्या. ही फाशी दिल्यानंतर ब्रिटिशांनी जेलच्या मागील परिसरातच तिघांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. tv9 च्या या विशेष मालिकेत या तिघांपैकी राजगुरू या क्रांतिकाऱ्याच्या जीवनावर एक नजर टाकुयात…
राजगुरू यांचं पूर्ण नाव शिवराम हरि राजगुरू असं होतं. पुण्यातील खेडा गावातील मराठी कुटुंबात 24 ऑगस्ट 1908 रोजी त्यांचा जन्म झाला. हरि नारायण हे त्यांचे वडील तर आईचं नाव पार्वतीबाई होतं. राजगुरु लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आई आणि मोठ्या भावाच्या छत्रछायेखाली त्यांचं पालनपोषण झालं. १२ व्या वर्षापासूनच संस्कृतचं शिक्षण घेण्यासाठी ते वाराणसीला गेले.
वाराणसीला पोहोचताच राजगुरू यांचा भारतातील स्वातंत्र्य चळवळीकडील ओढा वाढला. क्रांतिकारींशी त्यांचा संपर्क वाढू लागला. 16 व्या वर्षी चंद्रशेखर आझादांशी त्यांची भेट झाली. राजगुरुंच्या उत्साहाने आझाद प्रभावित झाले. त्यांना सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीत सहभागी करून घेतलं.
लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आधीपासूनच प्रभाव होता. पुढे भगतसिंग आणि सुखदेव यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांचाही प्रभाव पडला. काही दिवसातच तिघे चांगले मित्र बनले. अनेक क्रांतिकारी कारवाया त्यांनी यशस्वी केल्या.
ब्रिटिशांच्या सायमन कमीशनचा विरोध करताना लाठीचार्जमध्ये लाला लाजपत राय शहीद झाले होते. त्यांच्या या हत्येचा बदला घेण्यासाठी 9 डिसेंबर 1928 रोजी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेवसहित इतर क्रांतिकारींनी एक प्लॅन आखला. लाहोरमध्ये सँडर्सची हत्या केली. या हत्येनं ब्रिटिश अधिकाऱ्यांचा तीव्र संताप झाला. त्यामुळे भगत सिंह आणि राजगुरू आणि सुखदेव यांच्या अटकेसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. भगत सिंग आणि राजगुरू लाहौरला गेले. राजगुरु लखनौमध्ये उतरले आणि भगत सिंग हावड्याकडे गेले. नंतर राजगुरू वाराणसीत गेले. तेथे ब्रिटिशांचा बंदोबस्त पाहून नागपूरला गेले. त्यानंतर पुण्याला जाताना ते पकडले गेले.
राजगुरू पकडले गेले त्याच वेळी असेंबलीत बॉम्बस्फोट घडवून आणल्याने भगतसिंह पकडले गेले. सुखदेवांनाही अटक झाली. लाहौर येथील कटासाठी या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 24 मार्च 1931 ही तारीख निश्चित झाली. मात्र ही बातमी कळताच सामान्य भारतीयांचा असंतोष उफाळून आला. ठिकठिकाणी धरणं, आंदोलनं सुरु झाली. हा विरोध पाहता ब्रिटिशांनी तिन्ही क्रांतिकारींना एक दिवस आधीच फासावर चढवलं. लोकांच्या रोषापासून बचावासाठी त्यांच्यावरील अंत्यसंस्कारही उरकून टाकले. अशा प्रकारे वयाच्या 22 व्या वर्षीच राजगुरूंनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांच्या त्यागाप्रीत्यर्थ पुण्यातील त्यांच्या खेडा या गावाचं नाव राजगुरू नगर असं ठेवण्यात आलं 2013 मध्ये त्यांच्या नावाने टपाल तिकिटही जारी करण्यात आलं होतं.