Baba Siddiqui Murder : लढाई अजून संपलेली नाही – वडिलांच्या निधनानंतर झिशान सिद्दीकी यांचा निर्धार

| Updated on: Oct 21, 2024 | 8:51 AM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येला आठवडा उलटून गेला आहे. 12 ऑक्टोबरला 3 हल्लेखोरानी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली

Baba Siddiqui Murder : लढाई अजून संपलेली नाही - वडिलांच्या निधनानंतर झिशान सिद्दीकी यांचा निर्धार
Image Credit source: social media
Follow us on

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येला आठवडा उलटून गेला आहे. 12 ऑक्टोबरला 3 हल्लेखोरानी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे, मात्र मुख्य मारेकरी शिवकुमार, तसेच शुभम लोणकर आणि झिशान अख्तर या तिघांचा शोध अद्याप सुरू असून लोणकरविरोधात तर लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. सिद्दीकी याच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुबियांना मोठा धक्का बसला असून राजकीय क्षेत्र तसेच बॉलिवूडमध्येही खळबळ माजली.

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी एक विधान केले, मारेकऱ्यांचा आता माझ्यावर निशाण आहे. पण मी कोणालाही घाबरत नाही, ही लढाई अजून संपलेली नाही, असे सांगत झिशान यांनी निर्धार व्यक्त केला. माझे वडील जसे ताठपणे उभे होते, मीही तसाच पाय रोवून उभा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सोशल मीडिया साईट ‘X’ वर ट्विट करून झिशान सिद्दीकी यांनी मोठा दावा केला.’ त्यांनी माझ्या वडिलांना कायमचे गप्प केले. पण ते विसरले की ते सिंह होते आणि मीही त्यांचाचा मुलगा आहे. त्यांचेच रक्त माझ्या नसानसांत आहे. माझे वडील न्यायासाठी ठामपणे उभे राहिले, परिवर्तन करण्यासाठी लढले आणि वादळांचा धैर्याने सामना केला.’ असे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी नमूद केले.

लढाई संपलेली नाही

पुढेही झिशान यांनी लिहीलं की ‘ ज्यांनी त्यांची हत्या केली, त्यांना ( मारेकऱ्यांना) वाटतं की ते जिंकले. पण मला त्यांना सांगायचंय की त्यांचंच (बाबा सिद्दीकी) रक्त माझ्या अंगात आहे. मी निर्भय आणि स्थिरपणे उभा आहे. त्यांनी एकाला मारलं पण मी त्यांच्याच जागी उभा राहिलोय. ही लढाई अजून संपलेली नाही ’ असं झिशान सिद्दीकी म्हणाले. ‘मी नेहमी तुमच्याचसोबत आहे’ असे त्यांनी वांद्र्यातील लोकांना उद्देशून म्हटले.

 

10 व्या आरोपीला अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या अटकेसह या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. भागवत सिंग ओम सिंग असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मळचा राजस्थानमधील उदयपूर येथील रहिवासी असून तो सध्या नवी मुंबई येथे राहत होता. आरोपीवर शूटरला शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितलं.

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या आमदार मुलगा, झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप हे संशयित शूटर पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि खुनाच्या कटात सहभागी असलेले अन्य दोन जण फरार आहेत.