मुक्ताईनगर: राज्यात तपास यंत्रणांनी धाडसत्रं सुरू केलं आहे. त्यावरून राज्याचे मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपवर (bjp) जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातच (maharashtra) सर्वाधिक ईडीच्या कारवाया होत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात या कारवाया होत नाहीत. जिथे भाजपचे राज्य आहे तिथे एक तरी कारवाई दाखवा? देशात लोकशाहीच शिल्लक राहिली नाही. आता फक्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन कारवाया करायचे तेवढेच शिल्लक राहिले आहे. एवढी जुलूमशाही मुघलांच्या राज्यातही पाहिली नव्हती. यांना भोगावे लागेल, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला. केवळ सत्ताधाऱ्यांना नामोहरण करण्यासाठी या ईडीच्या कारवाया सुरू आहेत. एकाही भाजप नेत्याविरोधात ईडीची कारवाई होत नाही. जे भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांच्यावर ईडीची कारवाई होत नाही. या मागचं गौडबंगाल काय? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित करून भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.
बच्चू कडू हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. जळगाव जिल्ह्यात दोन विधानसभा, खासदार व जिल्हा परिषद पंचायत समिती त्यासंदर्भात आमची चाचपणी सुरू आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हनुमान चालिसाचं आंदोलन सुरू केलं आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता ते पत्रकारांवरच भडकले. भोंगे, हनुमान चालिसा कुणी दाखवले? तुम्हीच ना? भोंगे आणि हनुमान चालिसा शिवाय मीडियाला दुसरे प्रश्नच दिसत नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी केद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार सोयाबीन आयात करेल असं वाटत होतं. तेल स्वस्त होईल असं वाटलं होतं. पण केंद्र सरकारने तेल आयात करून सोयाबीनचे भाव वाढून टाकले आहेत. आपल्या पंतप्रधान मोदींनी केलेल्या आयातीचे निर्णय अदानी, अंबानी यांच्या हिताचे घेतले आहेत. त्यामुळे आपण किती अदानी, अंबानी पुरस्कृत आहोत हेच केंद्र सरकारने दाखवून दिलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची स्तुती केली. महाराष्ट्रासाठी गडकरी यांनी काहीतरी दिलं. गडकरींचा अपवाद वगळला तर केंद्राने महाराष्ट्राला काय दिलं? असा सवाल त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळापासूनच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न रखडला आहे. मागच्या सरकारने काही केले नाही. त्यामुळे आघाडी सरकारलाही काही करता आले नाही. त्यामुळे ओबीसींचं मोठं पतन होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.