अमरावती : माझ्या पतीने आत्महत्या केल्यास राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक दीपक भोंगाळे, ठाणेदार, बिट जमादार, तहसीलदार जबाबदार असतील, असा आरोप अमरावतीतील बेपत्ता शेतकऱ्याच्या पत्नीने केला होता. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं. आमचं काही चुकल्यास गुन्हा नोंदवला तरी चालेल, पण आपण सुखरुप घरी परत या, असं आवाहन बच्चू कडूंनी बेपत्ता शेतकऱ्याला केलं. (Bacchu Kadu clarified no connection with Farmer warn Suicide in Amravati)
अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील चांदुरबाजार तालुक्यात हा प्रकार घडला. देऊरवाडा येथील विजय सुने या शेतकऱ्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहिली. त्यानंतर सोमवारपासून घरुन बेपत्ता झाले.
विजय सुनेंनी लिहिलेल्या चिठ्ठीत शिरजगाव कसबाचे ठाणेदार, बीट जमादार आणि तहसीलदार यांची नावे लिहून ठेवली आहेत. त्यानंतर शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माझ्या पतीने आत्महत्या केली, तर याला ठाणेदार, बीट जमादार, तहसीलदार, राज्यमंत्री बच्चू कडू आणि बच्चू कडू यांचे खाजगी स्वीय सहाय्यक दीपक भोंगाळे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
“हा माझ्या बदनामीचा डाव”
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावर प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. चिठ्ठीत त्यांनी आमचे नाव लिहिले नाही. हा माझी बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.
आम्ही जर काही चुकीचे केले असेल, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र आपण कुठं गेले आहात, तिथून सुखरुप घरी यावं, अशी विनंती बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याला बच्चू कडू यांनी केली. शेतीच्या रस्त्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून तहसीलदाराने दिलेल्या आदेशामुळे माझे शेतीचे नुकसान होणार असल्याचा दावा शेतकऱ्याने चिठ्ठीत केला आहे.
यापूर्वी, राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकरी अशोक भुयार यांनी 22 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. ‘घडलेली घटनाही दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. माझ्याकडून जर फोन उचलला गेला नाही, तर एक मेसेज करा. अडचणी सोडवण्यासाठी मी माझे मंत्रिपपद पणाला लावेल, असे बच्चू कडू म्हणाले होते.
संबंधित बातम्या
मंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या, आता बच्चू कडू म्हणतात, मंत्रिपद पणाला लावणार
(Bacchu Kadu clarified no connection with Farmer warn Suicide in Amravati)