महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना निकाल लागून पाच दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये खल सुरु आहे. असं असतानाच आता महायुतीत दोन सुरु पाहायला मिळत आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं जात आहे. तर शिवसेना शिंदे गट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावं, अशी भूमिका मांडत आहेत. महायुतीतील मित्रपक्ष प्रहारचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळेच मागे भाजप पक्ष सत्तेत आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल नसतं तर भाजप सत्तेत आलं असतं का? याचं सगळं श्रेय एकनाथ शिंदे यांना जातं. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर लाडकी बहीण योजना भेटली नसती. तुम्हाला एकनाथ शिंदेंमुळे ही योजना भेटली. म्हणून भाजपचे लाडके भाऊ आता सत्तेत आले आहेत. त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षित करता येणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
जातीचा आणि धर्माचा फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचं ठरला. धर्माचा झेंडा जिंकला आणि आमच्या सेवेचा झेंडा या निवडणुकीत हरला. झेंडे जिंकले, सेवा हरली…. कुठल्याही निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे.. EVM मध्ये पारदर्शकता नाही. जगातील सगळे देश बँलेट पेपरवर जर निवडणुका घेत असतील तर भाजप का म्हणत नाही आम्ही बँलेट वर घेऊ असं का म्हणत नाही?, असं बच्चू कडू म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू पराभूत झाले. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केला आहे. यावरून बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. मला पाडण्याचं श्रेय घेणाऱ्याना सांगतो की तुमची बच्चू कडूला पाडण्याची औकात नाही…तुम्ही म्हणाल तो मतदारसंघ तिथे मी उभा राहील… मला पाडण्याच जे श्रेय राणा घेत आहे पण त्यांची ती ताकद नाही… आम्ही आता मतदारसंघात प्रयोग करू…, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.