मुंबई – बदलापूर शहरातून मुरबाडला जाण्यासाठी बारवी डॅममार्गे एकमेव रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर हा अहमदनगर, शिर्डी, माळशेज, शहापूर, नाशिककडे जाण्यासाठी केला जातो. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. परंतु सध्या या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहेत. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी ही एमआयडीसीकडे आहे. मात्र एमआयडीसीनं गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अक्षरशः वाऱ्यावर सोडलाय. त्यामुळं वाहनचालकांना याचा मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतोय. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. या रस्त्याच्या अवस्थेबाबत स्थानिक आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आपण अनेकदा एमआयडीसीच्या मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत पत्रव्यवहार केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र तरीही एमआयडीसी रस्त्याकडे लक्ष देत नसून, एमआयडीसीला फक्त जागा खरेदी आणि विक्री करणे इतकाच धंदा असल्याची टीका कथोरे यांनी केली
दरवर्षी बारवी धरण भरल्यानंतर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धरणावर जलपूजन करण्यासाठी येत असतात. त्यांच्या येण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती केली जाते. मात्र यावर्षी जलपूजन झालेलंच नाही. त्यामुळेच यंदा रस्त्याच्या दुरवस्थेकडेही एमआयडीसीनं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळं आता नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष द्यायला एमआयडीसीला कोणता मुहूर्त सापडतो हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या
आधी तुरुंगातील जेवण घ्या, अनिल देशमुखांना कोर्टाने फटकारले; घरचे जेवण देण्याची मागणी फेटाळली