माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, मागितली 50 लाखांची खंडणी अन्…

| Updated on: Mar 14, 2025 | 9:10 AM

बदलापुरातील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे.

माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, मागितली 50 लाखांची खंडणी अन्...
Badlapur Extortion
Follow us on

बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंसोबत हा प्रकार घडला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. यानंतर समोरच्या व्यक्तीने हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्यांनी त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटल्याने वडनेरे यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली.

बदलापूरमधूनच चार जणांना बेड्या

या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास केला. यानंतर त्यांनी बदलापूरमधूनच चार जणांना बेड्या ठोकल्या. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या चौघांची नावं आहेत. या सर्वांना १२ मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने धमकी

या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातून जामीनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी दिली. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडत त्यांना पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या.