तर मुलगी शिकली, प्रगती झाली… या वाक्याला अर्थ काय?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Aug 22, 2024 | 1:03 PM

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरू केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. बदलापुरात मोठ जनआंदोलन झालं. शहरातील जनता रस्त्यावर उतरली होती. याच मुद्यावरून राजकारणही बरंच पेटलं असून विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्यात येत आहे.

तर मुलगी शिकली, प्रगती झाली... या वाक्याला अर्थ काय?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
Follow us on

‘गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात खंत आहे की आपण नेमकं कसं जगतोय ? मुलंबाळं शाळेत जातात, पण त्या शाळेमध्ये देखील मुली जर सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार ?’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्यांसोबत झालेल्या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील वातावरण पेटलं आहे. राजकीय पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला असून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनीही या मुद्यावर भाष्य केले. महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही असे सांगत या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र कुटुंब बनून कोरोनाच्या विरुद्ध लढला. तशीच ही वेळ आली आहे, विकृतीचा निषेध नाही तर बंदोबस्त करण्यासाठी राज्यातील माता भगिनींना आवाहन करतो असे ते म्हणाले. राज्याने व्यक्त होण्याची गरज आहे. राजकारण म्हणून नाही तर माता भगिनीं सुरक्षित राहिली पाहिजे. याचा भान सर्वांना हवं. त्यानंतर राजकारण येतं.

मी वर्तमानपत्रातील बातम्या आणल्या आहेत. २१ ऑगस्टची बातमी आहे. गेल्या पाच वर्षात २० हजार बालिकांवर अत्याचार ही बातमी , त्यानंतर काल एक बातमी आली, असंवेदनशीलतेचा निषेध केल्याची बातमी आहे. चांदिवलीत एका चिमुरडीवर अत्याचार झाला. लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली. मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ झाल्याची बातमी आहे. हे कुठपर्यंत पाहायचं. गेल्या आठवड्यात बंगालमध्ये कृत्य घडलं. देशभरात आगडोंब उसळला. त्या आधी निर्भया झालं. तेव्हाही देश खडबडून जागा झाला. तशीच ही घटना आहे. जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो. तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. तो क्षण जवळ आला आहे. या बंदमध्ये राजकारण नाहीये असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हा विकृतीचा व्हायरस आहे,

यावेळी उद्धव ठाकरे यांनी या बंदमागचं कारणंही स्पष्ट केलं. कोरोना व्हारसशी लढलो, तसा हा विकृतीचा व्हायरस आहे, राज्यातील कानाकोपऱ्यात वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा बंद करत आहोत. त्यामागे राजकारण नाहीये असे त्यांनी नमूद केलं.

बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात

याच पत्रकार परिषदेदम्यान उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजोनवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.  सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात, असे ते म्हणाले.  24 ऑगस्टला जातपात धर्म, पक्ष भेद बा जूला ठेवून बंदमध्ये या. मुलगी ही मुलगी असते. आपल्या राज्यात मुलींना शिक्षणाची मोफत शिक्षणाची सोय आहे. पण ती सुरक्षित नसेल तर उपयोग काय ? उठो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद न आयेंगे… ही कविता आहे. आजच्या परिस्थितीवर चपखल बसणारी कविता आहे.

पण जी मुलगी कडेवर जाण्याच्या वयातील आहे, तिच्यावर अत्याचार होत असेल तर ती लढणार कशी? असा सवालही त्यांनी विचारला.  ही मुलं घाबरून गप्प बसतात. पण त्यांच्यावरील अत्याचारावर पोलीस ढिम्म बसत असतील तर काय करायचं?  परवापासून जे सुरू आहे. तो जनतेचा उद्वेग आहे. हा संप राजकीय नाही. तर माता भगिनींच्या रक्षणासाठी आपण जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी बंद आहे. स्वतहून पुढे या आणि बंद करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.